पालिकेची आणखी ६० उद्याने होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:11 AM2021-01-21T04:11:54+5:302021-01-21T04:11:54+5:30
पुणे : महापालिकेने शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनंतर पालिकेच्या २०४ उद्यानांपैकी ८१ उद्याने उघडली होती. आणखी ६० उद्याने उघण्याचा निर्णय ...
पुणे : महापालिकेने शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनंतर पालिकेच्या २०४ उद्यानांपैकी ८१ उद्याने उघडली होती. आणखी ६० उद्याने उघण्याचा निर्णय घेतला असून आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले.
शहरात पालिकेच्या मालकीची २०४ उद्याने आहेत. प्रशासनाने लोकवस्ती, कोरोना रूग्णांची संख्या आदी गोष्टींचा अभ्यास करून ८१ उद्याने सुरू केली होती. उर्वरित उद्याने उघडण्याची मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधी करीत होते. कोरोना रूग्णांची घटलेली संख्या पाहता आणखी ६० उद्याने उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराच्या सर्वच भागातील उद्यानांचा समावेश आहे. सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असे एकूण चारच तासच ही उद्याने उघडी राहणार असून केवळ चालणे, धावणे यासाठीच उद्यानांचा वापर करता येणार आहे. उद्यानात बसणे, गप्पा मारणे, गर्दी करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचे बंधन घातले आहे. हास्य क्लब, योगा, शूटिंग, सामुदायिक-सांस्कृतिक-सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही.
जिम साहित्य, खेळणी, बेंचेस आणि हिरवळीचा वापर टाळावा. उद्यानात पान, तंबाखू, थुंकण्यास सक्त मनाई केली आहे. यासोबतच १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गरोदर स्त्रीयांना प्रवेश देणार नसल्याचे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.