Pune Accident Video: पुण्यात पुन्हा एकदा अपघात; येरवड्यातील गोल्फ चौकात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 18:14 IST2024-06-18T18:13:48+5:302024-06-18T18:14:48+5:30
दुचाकी स्लिप होऊन रस्त्यावर पडले असता पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेली

Pune Accident Video: पुण्यात पुन्हा एकदा अपघात; येरवड्यातील गोल्फ चौकात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
किरण शिंदे
पुणे: पुणे पोर्शे अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात आलिशान मर्सिडीज बेंज गाडीखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मर्सिडीज बेंजच्या चालकाला ताब्यात घेण्यात आली असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
केदार मोहन चव्हाण (वय ४१) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर मर्सिडीज बेंजचा चालक नंदू अर्जुन ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात देण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीनी जात होते. यावेळी दुचाकी स्लिप झाल्याने केदार चव्हाण रस्त्यावर कोसळले. याचवेळी पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी त्यांच्या अंगावर गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजतात येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.