पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांना ट्रकने उडवले, ३ कारला धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 10:40 AM2021-12-28T10:40:38+5:302021-12-28T10:40:59+5:30
पुणे सातारा रस्त्यावर कात्रज ते पुणे या तीव्र उताराच्या रस्त्यावर नेहमी अपघात घडतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पुणे सातारा रस्त्यावर कात्रज ते पुणे या तीव्र उताराच्या रस्त्यावर नेहमी अपघात घडतात. आज मात्र, पुण्याहून सातार्याकडे जाणार्या रस्त्यावर मोठा अपघात झाला आहे. अचानक ट्रक उलटा मागे आल्याने त्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवले. त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर तो ट्रक तसाच उतारावर मागे आला व त्याने येणार्या तीन चारचाकी गाड्यांना धडक दिली. मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी, पुण्याहून सातार्याच्या दिशेने एक ट्रक जात होता. त्याचे डिझेल संपल्याने त्याने डिझेल भरले. त्यात एअर अडकल्याने तो एअर काढत होता. असे असताना अचानक उतारावर हा ट्रक मागे येऊ लागला. त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला तिघे जण थांबले होते. त्यांचे लक्ष उजव्या बाजूला येणार्या वाहनांकडे असल्याने आपल्या दिशेने उलटा ट्रक येतो आहे, हे त्यांच्या लक्षातच आले नाही. ट्रकने त्यांना उडवले. त्यानंतरही हा ट्रक थांबला नाही. उतारावर वेगाने उलटा जाऊ लागला. त्याने पाठीमागून येणार्या तीन कारना धडक दिली. कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघाताने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी अपघातातील वाहने बाजूला काढण्यास सुरुवात केली आहे.