कात्रज कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; काल वृद्ध महिलेचा बळी तर आज ज्येष्ठाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 01:11 PM2023-08-14T13:11:01+5:302023-08-14T13:14:32+5:30
पुणे महापालिका आयुक्तांनी पाहणी केल्यानंतरही मागील आठ दिवसात हा चौथा बळी
कोंढवा : कात्रजकोंढवा रस्त्यावरील अपघाताचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज (ता. १४) सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत एका वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कोंढव्यातील स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला. सदर अपघात कात्रज कोंढवा रोड वरील रस्त्यावरील खसलेले चेंबर व MNGL ची रस्त्यात खचलेले लोखंडी झाकण याला हुकवण्यासाठी चालकाने वेगात गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीचा ताबा सुटल्याने शेजारीच चालत असलेल्या पादचाऱ्याच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. विष्णू हाणामाय्या अंदरिंकी (वय 61, रा. शिव प्लाझा दशरथ मरळ चौक, सोमजी बस स्टॉप जवळ कोंढवा पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे.
मागील आठ दिवसात हा चौथा बळी असून आयुक्त विक्रम कुमार यांनी कात्रज कोंढवा रस्त्याची पाहणी केल्यापासून झालेल्या अपघातात तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. या रस्त्यावर होणारे वारंवार अपघात व अपघातांची संख्या व मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी यावर प्रशासन एवढे गप्प का? आणखी किती बळींची वाट प्रशासन बघणार आहे. असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. संतप्त कोंढवा ग्रामस्थांनी आज तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी माजी आमदार महादेव बाबर, राकेश कामठे, प्रवीण ठोसर, संदीप बधे, विनायक कामठे, चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब ठोसर, माऊली कामठे, हेमंत बधे, सोनू टिळेकर, अमर कामठे, विशाल कामठे, किरण ठोसर, सुखदेव कामठे, वसंत कामठे आधी कोंढव्यातील सर्व संतप्त ग्रामस्थांनी यावेळी रस्ता रोको आंदोलन केले.