हप्ता न दिल्याने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:28 AM2020-12-13T04:28:39+5:302020-12-13T04:28:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कंपनी सुरू ठेवण्यासाठी एक लाख रुपयांचा हप्ता दिला नाही, तसेच चुलत भावाच्या लग्नाला बोलावले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनी सुरू ठेवण्यासाठी एक लाख रुपयांचा हप्ता दिला नाही, तसेच चुलत भावाच्या लग्नाला बोलावले नाही, या रागातून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणातील आणखी एकास येरवडा पोलिसांनी अटक केली. लखनसिंग महिंदर भोंड (वय २५, रा. बिराजदार नगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याप्रकरणात यापुर्वीच ९ जणांना अटक केली आहे. तर अन्य पाच जणांचा पोलिस शोध घेत आहे.
याबाबत, २८ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली होती. ६ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास येरवडा येथे सुरक्षानगरकडे जाणार्या रस्त्यावर हा प्रकार घडला. फिर्यादीने आरोपींना कंपनी सुरू ठेवण्याचा एक लाख रुपयांचा हप्ता दिला नाही. तसेच चुलत भावाच्या लग्नाला बोलविले नाही याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादीचा खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या वाहनाचे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये भोंड आढळून आला असून त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परिणामी, त्याला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.