कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणी आणखी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 09:36 PM2021-07-15T21:36:35+5:302021-07-15T21:49:18+5:30
कला दिग्दर्शक राजेश मारुती साप्ते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
पिंपरी : कला दिग्दर्शक राजेश मारुती साप्ते (वय ५१) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. साप्ते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी यापूर्वी तीन जणांना अटक केली आहे.
राकेश सत्यनारायण मौर्य (वय ४७, रा. कांदिवली ईस्ट, मुंबई), असे गुरुवारी (दि. १५) अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी साप्ते यांचा बिझनेस पार्टनर चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. एकतानगर, कांदिवली वेस्ट, मुंबई), नरेश विश्वकर्मा आणि दीपक उत्तम खरात (वय ३७, रा. गोरेगाव पूर्व, मुंबई) यांना अटक केली आहे. त्यांच्यास गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोनाली राजेश साप्ते (वय ४५, रा. ताथवडे, सध्या रा. कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी याप्रकरणी ३ जुलै २०२१ रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनाली साप्ते यांचे पती राजेश साप्ते यांना जीवे मारण्याची तसेच लेबर लोकांना कामावर येऊ देणार नाही आणि व्यवसायिक नुकसान करण्याची आरोपींनी धमकी दिली. वारंवार धमकी देऊन जबरदस्तीने १० लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी राजेश साप्ते यांना त्यापोटी अडीच लाख रुपये जबरदस्तीने देण्यास भाग पाडले. तसेच आरोपी चंदन ठाकरे यानेही वेळोवेळी विश्वासघात व फसवणूक करून त्यांचे आर्थिक नुकसान केले. आरोपींच्या जाचाला कंटाळल्याने दिग्दर्शक साप्ते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा हा प्रकार ३ जुलै २०२१ रोजी उघडकीस आला.
-----------
अटकपूर्व जामिनासाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला
पोलिसांनी चंदन ठाकरे तसेच आरोपी नरेश विश्वकर्मा याला यापूर्वीच अटक केली. तर आरोपी राकेश मौर्य हा पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला गुरुवारी पिंपरी येथून पुणे-मुंबई महामार्गावरील मोरवाडी चौक परिसरातून पकडले. या प्रकरणात आरोपी दीपक खरात याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी खरात याला बुधवारी (दि. १४) अटक केली. त्याला सोमवारपर्यंत (दि. १९) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.