गारवा हॉटेल मालकाच्या खूनप्रकरणी आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:09+5:302021-07-27T04:11:09+5:30

पुणे - व्यवसायात अडथळा येत असल्याच्या कारणावरून गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचा खून केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ...

Another arrested in Garwa hotel owner murder case | गारवा हॉटेल मालकाच्या खूनप्रकरणी आणखी एकाला अटक

गारवा हॉटेल मालकाच्या खूनप्रकरणी आणखी एकाला अटक

Next

पुणे - व्यवसायात अडथळा येत असल्याच्या कारणावरून गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचा खून केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर या प्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या आठ जणांच्या पोलीस कोठडीत २९ जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

नीलेश आरते (वय २३) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, बाळासाहेब खेडेकर (वय ५६), निखिल खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या चौधरी (वय २१), अक्षय दाभाडे (वय २७) करण खडसे (वय २१), प्रथमेश कोलते (वय २३), गणेश माने (वय २०), निखिल चौधरी (वय २०, सर्व रा. हवेली) अशी पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्याची नावे आहेत. या प्रकरणी एका विधिसंघर्षित मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. १८ जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी नऊ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्यात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून अजून, आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पुराव्याची साखळी तयार करायची आहे. नेमका कश्या प्रकारे कट रचला गेला?, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली? गुन्ह्यातील हत्यारे कोठून आणली? नव्याने अटक केलेला आरोपी आणि अल्पवयीन मुलाला पळून जाण्याचा कोणी मदत केली? या आरोपींचा इतर कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी एकाला पोलीस कोठडी, तर इतरांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली.

---------------------

काय आहे प्रकरण?

निखिल याचे आखाडे यांच्या हॉटेल शेजारी हॉटेल आहे. आखाडे यांच्या हॉटेलमुळे खेडेकर यांच्या हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे बाळासाहेब खेडेकर याने त्याचा भाचा सौरभ चौधरी याला आखाडे याचा खून करण्यास सांगितले. आखाडे यांचा खून केल्यास तुला दररोज एक ते दोन हजार रुपये देऊ असे खुनाच्या दोन महिने आधी खेडेकर सांगितले होते. त्यानुसार चौधरी याने त्याचा साथीदारासह खून केला. आरते, चौधरी, खेडेकर, माने, खडसे, दाभाडे यांच्यावर हडपसर, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

-------------------------------------------------------------------------

Web Title: Another arrested in Garwa hotel owner murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.