वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:18+5:302021-09-16T04:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तब्बल १३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तब्बल १३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस तपासात संबंधित पीडित मुलगी पुणे स्टेशनवरून रेल्वेने दादर येथे उतरल्यानंतर ठाण्यातील एका ३२ वर्षीय तरुणाने बळजबरीने तिला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाला न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजेश शांताराम कुंभार (वय ३२, रा. शांताबाई चाळ, कोपरी ठाणे पूर्व), असे कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एकूण १७ आरोपींविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित अल्पवयीन पीडित मुलगी ३१ ऑगस्टला मुंबईतील एका मित्रास भेटण्याकरिता घरी कोणास काही न सांगता पुणे रेल्वे स्टेशनवर गेली होती; परंतु रात्री उशिरा गाडी नसल्यामुळे राहण्याची व्यवस्था करतो असे सांगत एका रिक्षाचालकाने तिला वानवडी येथे नेऊन तिच्यावर साथीदारांसह बलात्कार केला. दोन दिवसांत १३ जणांनी तिला वेगवेगळया ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली, तसेच मुलीचा मुंबईतील मित्र आणि दोन लॉज मालक यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, पीडित मुलगी पुण्याहून दादर रेल्वेस्टेशन येथे जाऊन प्लॅटफॉर्मवर मित्राची वाट पाहत होती. आरोपी राजेश कुंभार याने तिला वेफर्स, ज्यूस, तसेच पाण्याची बाटली घेऊन दिली. तिला गोड बोलून तिला मदत करण्याच्या बहाण्याने ठाणे येथील घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केली आहे.