पुण्यात भाजपला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता; संजय काकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 01:12 PM2024-10-11T13:12:58+5:302024-10-11T13:13:21+5:30
काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे
पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास शरद पवार यांच्याकडून भाजपला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर हा दुसरा मोठा धक्का ठरणार आहे.
काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. संजय काकडे यांनी ‘लोकमत’बरोबर बोलताना अजून नक्की काहीच नाही, चर्चेत अर्थ नाही असे सांगत वेळ मारून नेली आहे. काकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे आहेत. जो निर्णय घ्यायचा असेल तो फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून, त्यांना सांगूनच घेईल असेही ते म्हणाले.
संजय काकडे पुणे लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तेव्हापासून त्यांनी भाजपपासून अंतर राखले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदम त्यांच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
अशी चर्चा होत असते. मी सध्या भाजपमध्ये आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस माझे नेते आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतरच याविषयी बोलेल. - संजय काकडे, माजी खासदार राज्यसभा