सर्वसामान्यांना आणखी एक झटका! गायीचं दूध महागलं, दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 10:30 PM2024-07-13T22:30:01+5:302024-07-13T22:30:47+5:30
दुध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी दूध संघाची बैठक कात्रज डेअरी मध्ये पार पडली. या बैठकीत हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. मात्र म्हशी च्या दुधाच्या दरात मात्र कुठलीही वाढ झालेली नाही.
पांडुरंग मरगजे -
धनकवडी : गायीच्या दुधाच्या दरात आता दोन रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना आता प्रतिलिटरमागे दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या महागाईमध्ये त्रस्त सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. पुण्यात पार पडलेल्या दुध उत्पादकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी दूध संघाची बैठक कात्रज डेअरी मध्ये पार पडली. या बैठकीत हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. मात्र म्हशी च्या दुधाच्या दरात मात्र कुठलीही वाढ झालेली नाही.
यावेळी विविध सहकारी व खाजगी संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये चितळे डेअरी, पराग मिल्क, गोविंद दूध, नेचर डिलाईट, उर्जा दूध, राजहंस दूध, संतकृपा दूध, एसआर थोरात दूध, कात्रज दूध, गोदावरी दूध, अनंत दूध, सोनाई दूध, अक्षरा मिल्क, सुयोग मिल्क या दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शासनाने जाहिर केलेले गाय दूध अनुदानाचे धोरण दि. ०१/०७/२०२४ पासून लागू केलेले आहे. त्यानुसार दूध खरेदी दरात रु. ३/- ची वाढ ही सर्व संघांना स्वतः द्यावी लागणार आहे. रु. ३/- खरेदी दरात वाढ झालेली असली तरीही विक्री दरात मात्र रु. २/- वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेणेत आला. - गोपाळराव म्हस्के - अध्यक्ष - दुध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी दूध संघ