रवींद्र बऱ्हाटे टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:12 AM2021-02-12T04:12:17+5:302021-02-12T04:12:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पर्वती येथील एका जमीन प्रकरणात चत:श्रृंगी पोलीस ठाण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पर्वती येथील एका जमीन प्रकरणात चत:श्रृंगी पोलीस ठाण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
शैलेश जगताप, परवेज जमादार, जयेश जगताप, रवींद्र बऱ्हाटे, प्रशांत जोशी, देवेंद्र जैन, प्रकाश फाले, संजय भोकरे (रा. सांगली), विशाल तोत्रे, प्रेमचंद बाफना, प्रशांत बाफना, विनय मुंदरा, हारिश बाफना, राज किरण बाफना यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी निलमणी देसाई (वय ६८, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे.
पर्वती येथील जमीन निलमणी देसाई यांच्या वडिलांनी त्यांचे जावई धैर्यशील देसाई यांच्या नावावर केली होती. त्यातील काही जागा विकसित केल्यानंतर देसाई यांच्याकडे ४ हजार ९१३ स्क्वेअर मीटर जागा राहिली होती. धैर्यशील देसाई यांच्या नावावरील जागा तुमच्या नावावर करुन देतो, असे कोथरुड येथील प्रशांत जोशी यांनी फिर्यादीला सांगितले. त्यानंतर प्रशांत जोशी याने त्यांच्याकडे शैलेश जगताप, जयेश जगताप व इतर ही जमीन विकत घेण्यास इच्छुक आहेत. तेच या जमिनीवर तुमच्या पतीच्या वारसांची नावे रवींद्र बऱ्हाटेकडून लावून देणार असल्याचे सांगितले. शैलेश जगतापने ऋषिकेश बारटक्केला जागा विका असे सांगितल्यावर त्यांच्याबरोबर ५ कोटी रुपयांचा जमिनीचा व्यवहार ठरला. बारटक्केने निलमणी देसाई व त्यांच्या मुलीच्या नावावर प्रत्येकी पाच लाख रुपये जमा केले. त्यानंतर देसाई यांच्या नावाने शैलेश जगताप व इतरांनी बारटक्केला धमकावून २० लाख रुपये घेतले.
जानेवारी २०१८ मध्ये बारटक्केने वारस म्हणून फिर्यादीचे नाव लावून घेतले. त्यानंतर जमिनीची मोजणी होऊन देणार नाही, अशी धमकी देऊन सर्व आरोपी पैशाची मागणी करु लागले. संजय भोकरे, शैलेश जगताप, प्रशांत जोशी व इतरांनी खोट्या केसमध्ये अडकविण्याची व जीवे मारण्याची धमकी देत राहिले. भोकरेच्या कर्वे रोड येथील कार्यालयात बोलावून ४० लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर १० लाख रुपये रोख स्वरुपात घेतले, असे ऋषिकेश बारटक्केने फिर्यादीला सांगितले.
हा प्रकार प्रशांत जोशीला सांगितल्यावर तो एके दिवशी घरी आला व या विषयाची मूळ कागदपत्रे असलेली पिशवी जबरदस्तीने घेऊन गेला. शैलेश जगतापला फोन केल्यावर त्याने कागदपत्रे मिळणार नाहीत, ती जाळून टाकू, अशी धमकी त्याने फिर्यादीला दिली. यापूर्वी चतु:श्रृंगी पोलिसांनी फिर्याद घेतली नव्हती. असे निलमणी देसाई यांनी फिर्यादीत म्हटले आहे.