पुण्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी एक खटला दाखल; 'ही' केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 08:15 PM2021-03-02T20:15:23+5:302021-03-02T20:16:13+5:30
या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही.
पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी लष्कर न्यायालयात आणखी एक खटला दाखल करण्यात आला आहे. या आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी आणि त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने न्यायालयाकडे धाव घेतली असून, लष्कर न्यायालयात खटला दाखल केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर हा खटला दाखल झाला आहे. यापूर्वी लीगल जस्टिस सोसायटीतर्फे अॅड. भक्ती पांढरे यांनी देखील फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांचाही खटला लष्कर न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही अर्जांवर दि.5 मार्च रोजी निकाल होणार आहे. या दोन्हीही खटल्यात कोणतीही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव देण्यात आलेले नाही.
या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत,यासाठी आम्ही हा खटला दाखल केला असल्याची माहिती भाजपा वकील आघाडीच्या अध्यक्ष अॅड. ईशानी जोशी यांनी दिली.
-------------------------------
पूजा आत्महत्या प्रकरणामध्ये वानवडी पोलिसांनी तपास सुरू करावा आणि तक्रार दाखल करावी यासाठी 156 (3) या कलमाखाली लष्कर कोर्टात अर्ज दाखल केला. या घटनेला 22 दिवस उलटले तरी पोलिसांनी कोणताच तपास केलेला नाही. यासाठी काही दिवसांपूर्वी भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वानवडी पोलिस अधिका-यांची भेट घेतली होती. तेव्हा पोलिसांनी आजवर तक्रार दाखल करायला कुणीच आलेले नसल्याचे सांगितले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकतर््यांनी तक्रार दाखल करूनही सात दिवस झाले. पोलिसांना कुणीही तक्रार दाखल करण्याची वाट पाहाण्याची गरज नाही. पोलीस सुमोटो देखील दाखल करू शकतात. मात्र ते कुणाच्या आदेशाची वाट पाहात आहेत ते कळत नाही. मंगळवारी (दि.2) आमच्या अर्जावर युक्तीवाद झाला. न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतले. न्यायालयात खटला दाखल झाला आहे. याबाबतची पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.
अॅड. ईशानी जोशी, अध्यक्षा, भाजपा वकील आघाडी
-------------------------------------------------------------------
समाजाची बदनामी थांबून न्याय द्या...
पुण्यातील वकिलाची मुख्यमंत्र्याकडे मागणी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पूजाच्या चारित्र्याचे हनन होत असून काही घटकांकडून बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे. त्यांविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करत समस्त समाजाला न्याय देण्याची मागणी अॅड. रमेश राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, याप्रकरणात वेळोवेळी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावेत अशी तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात दिली असल्याचेही राठोड यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------