गुंड सचिन पोटे आणि साथीदारांविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:01+5:302021-03-06T04:10:01+5:30
पुणे : मुंढव्या भागातल्या एका पबमध्ये गुंड सचिन पोटे याने केलेल्या गोळीबाळासंदर्भातील प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. पोटेसह साथीदार ...
पुणे : मुंढव्या भागातल्या एका पबमध्ये गुंड सचिन पोटे याने केलेल्या गोळीबाळासंदर्भातील प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. पोटेसह साथीदार अजय शिंदे यांच्यावर ऑनलाइन बेटिंग प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिंदे याला अटक केली. मात्र मारणे टोळीतील गुंड सचिन पोटे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. या गुन्हयाच्या तपासामधूनच पबचालकानेच पोटे याने केलेल्या गोळीबाराची तक्रार गुन्हे शाखेकडे दिल्यानंतर मुंढवा पोलीस ठाण्यात पोटे व त्याच्या साथीदारांविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन क्रिकेट बेटिंग प्रकरणात एकाला धमकावल्याप्रकरणी सचिन पोटे आणि साथीदार अजय शिंदे यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेने शिंदेला अटक केली होती. मात्र, पोटे पोलिसांच्या हाती लागला नाही. पोटेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पब आणि हॉटेलचा भागीदार नुकताच गुन्हे
शाखेच्या युनिट ४ च्या कार्यालयात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना याप्रकाराबाबतची माहिती दिली. मुंढवा भागातील हॉटेल ‘वायकीकी’मध्ये असलेल्या पबमध्ये १५ जून २०१८ रोजी पोटे आणि साथीदार पार्टीसाठी आले होते. त्या वेळी पबमध्ये सुरू असलेल्या पार्टीत येरवडा भागातील एक व्यक्ती आली होती. पबमधील डिजेने त्या व्यक्तीच्या स्वागताची घोषणा ध्वनीवर्धकावर केली. पबमधील भागीदाराने त्या व्यक्तीचे स्वागत केले. त्यावेळी तेथे असलेला पोटेला राग आला आणि त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून त्या व्यक्तीच्या दिशेने गोळीबार केला. पोटे याने केलेल्या गोळीबारामुळे तेथे जमलेले सर्वजण घाबरले. त्यानंतर पोटे आणि साथीदारांनी
पबची तोडफोड केली. पबमधील घटनेची चित्रीकरण सीसीटीव्ही चित्रीकरणात झाले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी पोटेने चित्रीकरण करणारे यंत्र (डीव्हीआर) चोरले. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोटे आणि साथीदार पसार झाले.
-----------------------------------------------