दहशत निर्माण करणाऱ्या गजानन मारणेविरोधात आणखी एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:39+5:302021-02-24T04:10:39+5:30
पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करून दहशत निर्माण करणाऱ्या गजानन मारणे व त्याच्या समर्थकावर आणखी एक ...
पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण करून दहशत निर्माण करणाऱ्या गजानन मारणे व त्याच्या समर्थकावर आणखी एक गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
गजानन मारणे या गुंडावर खून, मारामारी, खंडणी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. परस्परविरोधी टोळी यद्धातून अनेकांचे खून झालेले आहे. मारणेप्रमाणेच त्याचा विरोधी टोळीप्रमुख बाहेर असून त्या टोळीमध्ये आणि जनतेत दहशत निर्माण व्हावी, जेणेकरून त्याच्या दृष्कृत्यात कोणी आड येणार नाही. म्हणून समर्थकांकरवी जनतेच्या मनात दहशत टिकवून ठेवण्यासाठी म्हणून कट करून यूट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांतून त्यांनी नियोजनपूर्वक ‘तळोजा कारागृह ते कोथरूड’ अशा वाहनांच्या ताफ्याचे चित्रिकरण व्हायरल केले. त्यावर ‘कमेंट-पोस्ट-लाइक’ करून नागरिकांच्या मनात दहशत बसविली. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होईल, असे वातावरण तयार केले, असा आरोप आहे.
मारणे याच्याविरुद्ध ७ गुन्हे प्रलंबित आहेत. या प्रलंबित केसमधील साक्षीदार, अन्यायग्रस्त, तक्रारदार यांच्या मनात अवाजवी भीती तयार करणे, नागरिकांच्या मनातली भीती कायम राहण्यासाठी सुनियोजित प्रयत्न केल्याचा पोलिसांचा कयास आहे. मारणेच्या सहकारी, समर्थकांनी सोशल मीडियावर टाकलेले व्हिडिओ व त्यावर व्यक्त होणारी मते, प्रतिक्रिया गुन्हेगारी स्वरूपाच्या, कायद्याच्या अनादर करणाऱ्या बेकायदेशीर प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे गजानन मारणे, त्याची आयटी टीम, संबंधित युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम प्रोफाईलधारक या सर्वांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट
भयमुक्त वातावरणाची ग्वाही
“कोणीही व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उदात्तीकरणासाठी सोशल मीडियाचा वापर करत असेल, लोकांमध्ये दशहत निर्माण करत असेल आणि अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींना कोणी प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियात त्यांच्या समर्थनार्थ कमेंट करून प्रोत्साहन देत असेल तर पोलीस कडक कारवाई करतील. नागरिकांसाठी वातावरण भयमुक्त असेल याची ग्वाही आम्ही देतो,” असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.