निमोणेत आणखी एका शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 06:29 AM2017-10-05T06:29:57+5:302017-10-05T06:30:11+5:30
शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील दुर्गेवस्ती येथे दोन महिन्यांपूर्वी एका युवा शेतक-याने केलेल्या आत्महत्येची घटना ताजी असताना आज आणखी एका
निमोणे : शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील दुर्गेवस्ती येथे दोन महिन्यांपूर्वी एका युवा शेतक-याने केलेल्या आत्महत्येची घटना ताजी असताना आज आणखी एका शेतक-याने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे मत आहे. पंचनाम्याच्या वेळी तशी चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळून आली आहे.
तुकाराम ऊर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे (वय ६५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे.
यासंदर्भात शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण बाबूराव दोरगे हे आपल्या कुटुंबासमवेत दुर्गेवस्ती येथे आपल्या शेतालगत राहतात. मयत तुकाराम ऊर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे हेही लगतच आपल्या कुटुंबासमवेत राहतात. बुधवार (दि. ४) सकाळी ६.३०च्या दरम्यान फिर्यादी प्रवीण यांना आपल्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला ते फास घेऊन लटकत असल्याचे दिसले. त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला खबर दिली असता, सदर घटनेचा शिरूर पोलिसांकडून पंचनामा केला.
त्यांच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीमध्ये सहकारी सोसायटी, खासगी व्यक्तींचे कर्ज तसेच किडनी आणि मूतखड्याच्या आजाराने आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पुढील कायदेशीर पूर्तता करण्यात आल्यानंतर उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरूर पोलीस स्टेशनचे पी.आय. राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार अविनाश गायकवाड अधिक तपास करत आहेत.
मयत तुकाराम ऊर्फ नानाभाऊ मनोहर दोरगे पंचक्रोशीत एक कसलेले मल्ल आणि वस्ताद म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी लाल मातीत अनेक मल्ल घडविले. एवढ्या कणखर माणसाचा शेवट असा विदारक झाल्याने पंचक्रोशी तसेच कुस्ती क्षेत्रातील सर्व मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.