पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा उघड; दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या रहिवासी पत्त्यावर बंद पडलेली कंपनी!
By प्रकाश गायकर | Updated: July 17, 2024 18:38 IST2024-07-17T18:37:25+5:302024-07-17T18:38:22+5:30
कंपनीच्या पत्त्यावर कोणीही वास्तव्य करत नसताना बनावट शिधापत्रिका बनवून तिचा वापर दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी केल्याचे समोर

पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा उघड; दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या रहिवासी पत्त्यावर बंद पडलेली कंपनी!
पिंपरी : वादग्रस्त आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी शहरातील तळवडे येथील रहिवासी पुरावा दिला. मात्र, प्रत्यक्षात त्या जागेवर बंद पडलेली कंपनी असून प्रमाणपत्रासाठी दिलेली शिधापत्रिका आणि पत्ता खोटा असल्याचे समोर आले आहे.
खेडकर यांनी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयातून सात टक्के अस्थिव्यंग असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचा प्रकार सोमवारी (दि. १५) उघड झाला. त्यांना ऑगस्ट २०२२ मध्ये हे प्रमाणपत्र देण्यात आले होते. प्रमाणपत्रावर अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या स्वाक्षरी आहेत.
पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवडमधील औंध सर्वोपचार रुग्णालय आणि पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यापैकी औंध रुग्णालयाने त्यांचा अर्ज नाकारला, तर वायसीएम रुग्णालयाने त्यांना तपासणीसाठी वेळ दिली. अर्ज करतेवेळी खेडकर यांनी शहरातील ज्योतिबानगर, तळवडे येथील रहिवासी पुरावा दिला होता. अर्ज करतेवेळी त्यांनी जो पत्ता दिला होता, तेथे जाऊन ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. जो पत्ता रहिवासी पुराव्यासाठी दिला होता, तेथे कोणतेही रहिवासी क्षेत्र नसून बंद पडलेली औद्योगिक कंपनी आहे. त्या जागेवर थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून, तिचा फलकही हटविण्यात आला आहे. ही मालमत्ता म. दि. खेडकर म्हणजेच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे आहे. ही कंपनी सद्य:स्थितीत बंद आहे. कंपनीचा पत्ता रुग्णालयात रहिवासी पुरावा म्हणून देत खेडकर यांनी खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. या कंपनीच्या पत्त्यावर कोणीही वास्तव्य करत नसताना बनावट शिधापत्रिका बनवून तिचा वापर दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.
तीन वर्षांचा मिळकतकर थकवला
पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर तळवडे येथील थर्मोव्हेरिटा या कंपनीच्या संचालकपदी होत्या. कंपनीची मिळकत त्यांच्याच नावावर आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षाचा २ लाख ७७ हजार रुपये मिळकतकर थकविल्याची माहिती महापालिकेतून मिळाली.