कात्रजमधून खंडणीसाठी आणखी एकाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका
By विवेक भुसे | Published: February 20, 2024 11:45 AM2024-02-20T11:45:21+5:302024-02-20T11:45:33+5:30
फोनवरुन शिवीगाळ करीत जर मुलाला जिवंत बघायचे असेल तर, त्याच्या अकाऊंटला ३० हजार रुपये टाका नाहीतर असे म्हणत धमकावले
पुणे : ७० लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरुनेच १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस येत असतानाच खंडणीसाठी आणखी एका १८ वर्षाच्या तरुणाचे अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण शिक्षण घेत असून तो कात्रजमधील संतोषनगरमध्ये रहायला आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता तो घरातून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्यानंतर रात्री उशिरा या तरुणाच्या मोबाईलवरुन घरातील लोकाना फोन आला. फोनवरुन शिवीगाळ करीत जर मुलाला जिवंत बघायचे असेल तर, त्याच्या अकाऊंटला ३० हजार रुपये टाका नाहीतर असे म्हणत धमकावले. त्यानंतर पैसे टाकल्याच्या १ तासामध्ये मुलाला सोडण्यात येईल. कुठल्या प्रकारचा रिपोर्ट केला तर मुलाची अपेक्षा सोडून द्या. एका तासामध्ये पैसे आले तर ठिक आहे. अभि गुस्सा मला तेरे लकडे के अकाऊंट मे डाल. बोहत हो गया तेरा अब देख मै क्या करता हू, अशी धमकी दिली.
मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. त्यात हा तरुण लोणावळा येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे एक पथक लोणावळ्यात पोहचले. त्यांनी या तरुणाची सुटका केली असून त्याला पुण्यात आणले आहे. त्याच्याकडे भारती विद्यापीठ पोलीस चौकशी करत आहे. त्यातून हा नेमका प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणारा भाडेकरु राजेश शेलार याला पोलिसांनी कास पठार परिसरातून ताब्यात घेतले आहे.