‘राष्ट्रवादी’च्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:16+5:302021-04-02T04:12:16+5:30
पुणे : मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले ...
पुणे : मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. या कथित पीडित महिलेने भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह गुुरुवारी (दि. १) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला.
दबावापोटी पोलीस राष्ट्रवादीच्या या नेत्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीत, असे तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेत कथित पीडित महिलेने दावा केला की, शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राजेश विटेकर यांनी माझ्यासोबत अत्याचार केले. त्यांची आई विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून माझ्यावर वारंवार खोटे आरोप करण्यात येत आहेत. गृहखाते आमचे आहे, सत्ता आमची आहे, माझ्याविरोधात गुन्हा दाखल करू शकणार नाही.
“बंदुकीचा धाक दाखवून, लग्नाचे अमिष दाखवून माझ्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषण केले. गेल्या वर्षभरापासून मी या अत्याचाराविरोधात पोलीस स्टेशनला गेले, परंतु कोणीही माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. शरद पवार साहेब मला मुलगा मानतात, ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत असे विटेकरांनी धमकावले,” असा आरोप संबंधित महिलेने केला.
मी एक शिक्षिका असून माझ्यावर असे अत्याचार होत असतील तर इतर अशिक्षित महिलांवर किती अन्याय होत असतील. माझ्याकडे व्हॉट्सअप चॅटसह अनेक पुरावे आहेत. मुलींची अब्रु लुटायची आणि त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करायचा हा कुठला प्रकार? सुप्रिया सुळेंकडे मी अनेकदा तक्रार केली परंतु माझी दखल घेतली नाही. राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना पाठिशी घालण्याचे काम केले जात आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना विटेकर यांच्याकडून धोका असल्याचे, संबंधित महिलेने सांगितले.
तृप्ती देसाई यांनी सांगितले की, “आमचा पक्ष सत्तेत आहे, आमचा गृहमंत्री आहे असे सांगून महिलांवर अत्याचार करण्याचे प्रकार घडत आहेत. राष्ट्रवादी नेत्यांविरोधात असे आरोप होत आहेत. ज्या पीडिता समोर येऊन सांगतात, त्यांना बदनाम करण्याचे काम नेत्यांकडून केले जाते. पुराव्यानुसार गुन्हा दाखल होत नसेल तर पीडितांनी करायचं काय? परभणी जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’चे लोकसभा उमेदवार राजेश विटेकर, हे शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्याकडून पीडित महिलेवर दबाव टाकला जातो. पुरावे देऊनही ते नेते आहे आहेत म्हणून गुन्हा दाखल होणार नाही, तुम्ही तडजोड करा असे पोलिस सांगतात. अनेकांकडे या पीडितेने मदत मागितली. त्यानंतर ही महिला भूमाता ब्रिगेडकडे आली. राजेश विटेकर कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”