डाळिंबांवर आणखी एक संकट
By admin | Published: July 6, 2016 03:13 AM2016-07-06T03:13:21+5:302016-07-06T03:13:21+5:30
पावसाने ओढ दिली असतानादेखील डाळिंब बागायतदारांनी शेततळ्यांच्या आधाराने डाळिंब बागा जगविल्या. मात्र, डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बारामती : पावसाने ओढ दिली असतानादेखील डाळिंब बागायतदारांनी शेततळ्यांच्या आधाराने डाळिंब बागा जगविल्या. मात्र, डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. डाळिंब बागायतदार चिंतेत आहेत. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणीला लागणारा खर्चदेखील जास्तच आहे.
सावतामाळीनगर (ता. इंदापूर) येथील डाळिंबाच्या बागावर तेल्या रोगाने थैमान घातले आहे. या संदर्भात येथील महिला शेतकरी केशरबाई शिंदे यांनी सांगितले, की साडेतीन एकरांत १२०० झाडांची लागवड केली आहे. सध्या डाळिंबाचा बहर येण्यास सुरुवात झाली. परंतु, तेल्या रोगामुळे फळे फुटत आहेत.
डाळिंबा बागा जगविण्यासाठी पाणी विकत घेतले. लाखो रुपये खर्च केला. एका झाडाला १०० ते १२० फळे लागतात. तोडणीपर्यंत ७० ते ८० फळे हाती येतात, असे येथील शेतकऱ्याने सांगितले. तेल्या रोगामुळे खर्च वाया गेला. बाग सोडून देण्याची वेळ आली आहे. केशरबाई शिंदे यांनी एकरी जिल्हा बँकेमार्फत पीकविमा उतरविला आहे. तसेच, दीड लाख रुपये कर्ज घेतले आहे. उत्पादन खर्च तरी यंदा निघणार का, अशी चिंता बागायतदारांना आहे.
अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव येथील भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा लावण्यात आल्या आहेत. बागा वाचवण्यासाठी येथील शेतकरी आटापिटा करीत आहेत. तेल्या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती आहे. पाण्यावर खर्च करताकरता रोगाचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी औषधांसाठी पैसे आणायचे कोठून?
असा प्रश्न पडला आहे. काही शेतकऱ्यांनी बागाच नष्ट करण्याचा विचार सुरू केला आहे. शेळगाव २५० ते ३०० हेक्टर, कडबनवाडी ५० हेक्टर क्षेत्रावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, असे येथील कृषी अधिकारी धेंडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
गेल्या वर्षीही नुकसान
गेल्यावर्षीही तेल्या रोग डाळींबावर पडल्याने शेतकऱ्यांना बागा तोडून टाकल्या होत्या. यावर्षी तरी उत्पन्न मिळेल या आशेवर शेतकरी होता.
अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव येथील बागा वाचवण्यासाठी येथील शेतकरी आटापिटा करीत आहेत.