पेपरफुटीच्या चौकशीसाठी आणखी एक पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:50 AM2018-02-23T01:50:44+5:302018-02-23T01:50:47+5:30
बारावी इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू असतानाच व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणखी एक त्रिसदस्यीय पथक बार्शीच्या तांबेवाडीला पाठविले जाणार आहे
पुणे : बारावी इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू असतानाच व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणखी एक त्रिसदस्यीय पथक बार्शीच्या तांबेवाडीला पाठविले जाणार आहे. त्यांच्याकडून पुन्हा एकदा झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली आहे.
बारावी इंग्रजीचा पेपर सुरू होताच तासाभरातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या वसंत महाविद्यालयातून (तांबेवाडी) प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. याप्रकरणाची चौकशी करून, त्याचा प्राथमिक अहवाल बुधवारी गटशिक्षणाधिकाºयांनी विभागीय मंडळाला तातडीने पाठवून दिला होता. त्यानंतर आता राज्य मंडळाचे पथक त्या ठिकाणी भेट देऊन चौकशी करणार आहे.
भरारी पथकांची निष्क्रियता
राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेत कॉपीसारखे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ याप्रमाणे २५२ भरारी पथके नेमली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विभागीय पातळीवरील विशेष भरारी पथक, महिला पथक कार्यरत आहे. इंग्रजी, गणित या विषयांच्या परीक्षेच्या दिवशी बैठी पथके संवेदनशील केंद्रांवर तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला गेला; मात्र ही ग्रामीण भागांमध्ये परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.
बार्शीच्या तांबेवाडीमध्ये झेरॉक्स दुकानातून सर्रास कॉपी पुरविल्या जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हॉट्सअॅपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल करून त्याची उत्तरे पुरविली जात होती. राज्य मंडळाकडून इतकी भरारी, विशेष, महिला व बैठी पथके कार्यरत असताना गैरप्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भरारी पथकांकडून योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडली जात नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. इंग्रजीच्या पहिल्या पेपरला संपूर्ण राज्यात केवळ ६२ कॉपीचे गैरप्रकार नोंदविण्यात आले. राज्यभर मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असतानाही भरारी पथकांकडून योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडली जात नसल्याने खूप कमी गैरप्रकार उजेडात येऊ शकत आहे.
सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनीही बारावीच्या परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात, कॉपीचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी मदत करावी, अशी विनंती राज्य मंडळाकडून दर वर्षी करण्यात येते; मात्र बहुतांश अधिकाºयांकडून याकडे लक्ष दिले जात नाही. परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र त्याचीही अंमलबजावणी अनेक परीक्षा केंद्रांनी केलेली नाही.