प्रवासी महिलांना जखमी करणारा दुसरा चोरटा जेरबंद
By Admin | Published: March 29, 2016 03:31 AM2016-03-29T03:31:29+5:302016-03-29T03:31:29+5:30
हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलांवर वार करून बॅग ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांपैकी मंज्या काळे या चोरट्याला दौंड लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून
पिंपरी : हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलांवर वार करून बॅग ओढून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांपैकी मंज्या काळे या चोरट्याला दौंड लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून भिगवण येथे अटक केली. समीक्षा तापस सिन्हा (वय २५) व त्यांची आई संपा तापस सिन्हा (वय ५४) यांच्यावर एक मार्च रोजी चोरट्यांनी हल्ला केला होता. यापूर्वी ६ मार्चला योगेश ऊर्फ शाकीर शाप्या भोसले या आरोपीस दौंडच्या लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. मंज्या मात्र पसार झाला होता.
पुण्यात कोथरूड येथे राहणाऱ्या समीक्षा व त्यांची आई संपा सिन्हा या दोघी एक मार्चला हावडा-पुणे एक्स्प्रेसने विलासपूर ते पुणे असा प्रवास करत होत्या.
पहाटे साडेपाचच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबली. त्या वेळी अज्ञात इसमांनी खिडकीतून हात घालून त्यांची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. सिन्हा यांना जाग आली. त्यांनी प्रतिकार केला. त्या वेळी त्यांच्या हातावर वार करून चोरटे पळाले होते. गुन्ह्याचा तपास पुणे जिल्ह्याचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक
विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.
सहा मार्चला योगेश ऊर्फ शाकीर शाप्या भोसले (रा. वेताळनगर) यास अटक केली.
२७ मार्चला दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धनंजय वीर यांना याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी मंज्या काळे (वय २३, रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा जखमी असून, त्यास उपचारासाठी भिगवण येथे
आणणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे
त्यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
तीन पोलिसांवर कारवाई
हल्ला झाला त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या तीन लोहमार्ग पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पोलीस नाईक बी. बी. लंकेश्वर, एस. आर. पाटोळे, ए. जी. काळे यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी त्यांची नेमणूक होती, तेथून ते पाच वाजताच निघून गेले होते. साडेपाच वाजता गुन्हा घडला, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, असे पुणे जिल्हा लोहमार्ग पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.