पुणेकरांसाठी आणखी एक आठवडा हुडहुडी; तापमान सरासरी १४ अंशावर राहणार
By श्रीकिशन काळे | Published: January 28, 2024 06:41 PM2024-01-28T18:41:33+5:302024-01-28T18:42:39+5:30
पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले होते
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी असून, यामध्ये चढ-उतार होईल आणि पुढील १५ दिवस म्हणजे ८ फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट अथवा पावसाची शक्यता नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यांत पहाटेचे व दुपारचे असे दोन्हीही किमान व कमाल तापमाने सध्याच्या दिवसात असणाऱ्या सरासरी तापमानाइतके म्हणजे पहाटेचे किमान १४ व दुपारचे कमाल ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे.
खान्देश, नाशिक, नगर, पुणे, छ. सं. नगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, अश्या १४ जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे ८-१० डिग्री से.ग्रेड (म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा १-२ डिग्रीने कमी) तर दुपारचे कमाल तापमान २६ डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी पेक्षा २ डिग्रीने कमी) दरम्यानचे असू शकते.
थंडी नेमक्या कोणत्या मार्गाने अवतरते ?
उत्तरभारतातून महाराष्ट्राच्या उत्तरसीमेवर जेथे समुद्रसपाटीपासून कमी उंचीत तयार झालेल्या नैसर्गिक घळ्यातून म्हणजे मुख्यत: खानदेशातील नंदुरबार, शिरपूर, रावेर ह्या भागातून तर विदर्भातील गोंदिया, तुमसर, मोहाडी, मार्गे उत्तरेदिशेकडून तसेच गडचिरोलीतील भामरागड, सिरोंचा आणि चंद्रपूर मार्गे ईशान्यकडून महाराष्ट्रात थंडीचा नेहमी प्रवेश होत असतो. अर्थात त्यावेळी महाराष्ट्रातील उच्चं दाब क्षीणता कशी आहे, ह्यावरही थंडी तीव्रता वहनाचे प्रमाण ठरले जाते. -माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ
थंडीचा प्रभाव नेमका कश्यामुळे ?
संपूर्ण गुजरात राज्य, महाराष्ट्रातील कोकण तसेच खान्देश व नाशिक जिल्ह्यातील क.स.मा.दे. तालुक्यातील क्षेत्रात साधारण ताशी ८-१० किमी. तर उर्वरित महाराष्ट्रात शांत पण ताशी १-२ किमी. वेगाने खानदेशातील नंदुरबार, शिरपूर, रावेर ह्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मध्यम का होईना पण थंडी जाणवत आहे. म्हणून तर सध्या संपूर्ण गुजराथ राज्य व मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्हे थंडावले आहेत, असे खुळे यांनी सांगितले.
पुण्यात थंडीपासून जरासा दिलासा !
पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले होते. त्यामुळे कडाक्याची थंडी जाणवत होती. परंतु, आता किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या वर पोचले असल्याने थंडीपासून पुणेकरांना दिलासा मिळत आहे. हीच थंडी आता दोन-चार दिवस राहण्याची शक्यता आहे.