ललित पाटील पलायन प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचे निलंबन
By नितीश गोवंडे | Published: October 27, 2023 03:54 PM2023-10-27T15:54:15+5:302023-10-27T15:54:26+5:30
कर्तव्यात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस सहआयुक्तांनी काढले आदेश
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळ काढला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला पळवण्यात आले. मात्र, असे असताना पोलिसांचा हलदर्जीपणा हे देखील यातील एक मुख्य कारण होते. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी याप्रकरणी अजून एका महिला अधिकाऱ्याला कर्तव्यात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्याचे आदेश काढले. सहायक पोलिस निरीक्षक सविता हनुमंत भागवत असे या निलंबित महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याआधी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते.
सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सविता भागवत यांची नेमणूक मुख्यालयाच्या कोर्ट कंपनी युनिटमध्ये होती. त्यांना ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयात असलेल्या कैदी वॉर्ड क्रमांक १६ येथे दिवसपाळीसाठी देखरेख अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपचारासाठी दाखल असलेल्या कैद्यांची कसून झडती घेणे गरजेचे होते. मात्र, भागवत यांनी तसे केल्याचे दिसून आले आले नाही, कारण त्याच दिवशी ललितकडे २ मोबाइल आढळले. तसेच भागवत यांनी कर्तव्यावर पूर्णवेळ थांबणे गरजेचे असताना त्या दुपारी दीडच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या कैदी वॉर्डमधून रवाना झाल्याची नोंद रजिस्टरमध्ये घेण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ९ अशी त्यांना ड्युटी लावलेली असताना केवळ अर्ध्यासाठी तासासाठी त्या ससूनमध्ये गेल्याचे देखील स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
तसेच, घटनेच्या दिवशी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी ललितला एक अज्ञात व्यक्ती आक्षेपार्ह काळ्या रंगाची ड्रग्ज असलेली सॅक घेऊन भेटला आणि त्यानंतर तो पसार झाला. त्यामुळे कर्तव्यातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणामुळे आरोपी ललित अनिल पाटील याला पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून जाण्यास मोकळीक मिळाली, असे निलंबनाच्या आदेशात म्हणण्यात आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, कर्तव्यावर असताना निष्काळजीपणाचे गैरवर्तन केल्याने शासकीय सेवेतून भागवत यांना निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे.