भारतीय संस्कृतीत जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर; डॉ. मोहन भागवत यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:06 AM2023-01-09T10:06:00+5:302023-01-09T10:06:07+5:30
सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असून ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतो
पुणे: समाज आणि मनुष्य केंद्रस्थानी ठेवून जागतिक पातळीवर अंतिम सुखाच्या शोधासाठी प्रयत्न झाले, तसेच विज्ञान केंद्रस्थानी ठेवून प्रयोग केले गेले तरीही अंतिम सुख सापडलेले नाही. या सर्व मंथनातून जे अमृत निघाले त्याचा लाभ घेणाऱ्यांनी घेतला. पण जे हलाहल बाहेर पडले ते पचवण्याची ताकद कोणाचीच नाही. ती ताकद केवळ भारतीय संस्कृतीत आणि भारतीय अध्यात्मात आहे. जगातील सर्व प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृतीत आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
'प्रसाद प्रकाशना'च्या अमृतमहोत्सवाचा सांगता समारंभ आणि ग्रंथ प्रकाशनप्रसंगी ते बाेलत होत. यावेळी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. उमा बोडस आदी उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले की, सुख हे मनुष्याचे अंतिम ध्येय असते. ते साध्य करण्यासाठी तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत असतो. परंतु या धावपळीत ज्या शाश्वत सुखाचा तो पाठलाग करीत असतो, ते सुख निसटते. ज्ञान, सुख आणि समृद्धी वाढली तरी अपूर्णतेची एक जाणीव आणि बोच सदैव जाणवत राहिली.
मुनगंटीवार म्हणाले की, आपली संस्कृती ही प्रश्न निर्माण करणारी नसून उत्तरे शोधणारी आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे, परंतु आनंदाचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा सर्व स्तरावर ऊहापोह, चर्चा आणि अभ्यास होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात पहिल्या दहांमध्ये येतो. आता या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. सोशल ॲनिमलपासून सेल्फीश ॲनिमल असा मनुष्यजातीचा प्रवास येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.