अँटासिड औषधांमुळे आरोग्यावर दूरगामी परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:47+5:302021-01-15T04:10:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन, सततचा ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या वेळा, अपुरी झोप अशा अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन, सततचा ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या वेळा, अपुरी झोप अशा अनेक कारणांमुळे पित्ताचा त्रास ही नेहमीची डोकेदुखी बनली आहे. पित्ताचा त्रास सुरू झाल्यास घरगुती उपाय करून पाहण्याइतका वेळ अनेकांकडे नसतो. त्यामुळे अँटासिडच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध अहवालानुसार, या गोळ्यांचा थेट मूत्रपिंडावर परिणाम होतो. अल्सर, हर्निया अशा आजारांनाही आमंत्रण मिळत असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आम्लपित्ताचा त्रास होत असल्यास प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य नसल्याने अँटासिडच्या गोळ्या घेतल्या जातात. भारतात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देण्यास कायद्यानुसार परवानगी नाही. मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार औषधविक्रेत्यांकडून सर्रास या गोळ्यांची विक्री होते. या गोळ्यांच्या सततच्या सेवनामुळे मूत्रपिंड आणि यकृताची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. त्यातून अवयव निकामी होण्याची गंभीर शक्यताही निर्माण होते. मूत्रमार्गातील संसर्ग, ह्रदयाची कार्यक्षमता कमी होणे, स्रायू कमकुवत होणे अशा समस्या उदभवतात.
डॉक्टरांकडे तब्येतीची तक्रार घेऊन गेल्यावर इतर गोळ्यांबरोबर जेवणाआधी घेण्यासाठी अॅसिडिटीच्या गोळ्या सर्रास दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांनी रुग्णाला तपासून त्याप्रमाणे औषधांचे डोस दिलेले असतात. त्यामुळे त्यातून अपाय होण्याची शक्यता कमी असते. याउलट मनाप्रमाणे अँटासिडच्या गोळ्या किंवा द्रव औषध वारंवार घेतले गेले तर त्यातून अपायाची शक्यता होते. अँटासिडमधील अॅल्युमिनियमच्या अतिरिक्त प्रमाणामुळे हाडे ठिसूळ होण्याची शक्यता असते.
चौकट
“अँटासिडच्या औषधांमध्ये आम्लाला मारक ठरणाऱ्या घटकांचा समावेश असतो. औषधांमधील घटकांमधून आम्लावर मारा करत असतो. त्यामुळे आम्ल तयार होण्याची किंवा त्याचे प्रमाण कमी होण्याची प्रक्रिया नैसर्गिक रीतीने होत नाही. यामुळे पित्ताशयाला सूज येण्याची शक्यता वाढते. कोकम सरबत, लिंबू पाणी, आमसूल, आवळा सुपारी अशा नैसर्गिक उपायांवर अवलंबून राहणे हिताचे ठरते.”
- डॉ. अनुज लेले, जनरल फिजिशियन
चौकट
“कोणत्याही आजारावरील गोळ्या सातत्याने घेतल्यास त्याचा शरीरावरील प्रभाव कमी होतो. अँटासिडच्या गोळ्यांमुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. स्रायू तसेच मज्जासंस्थेवरही परिणाम होऊ शकतो. किडनीचे विकार असलेल्यांनी वारंवार अँटासिडच्या गोळ्या न घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.”
- डॉ. मनोज भोईटे, जनरल फिजिशियन
-------------------------
आम्लपित्तावर नैसर्गिक उपाय कोणते?
- आहाराच्या, झोपेच्या वेळा नियमित पाळाव्यात.
- मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थांचे वारंवार सेवन करु नये.
- आम्लपित्ताचा त्रास होत असल्यास लिंबूपाणी, फळांचा रस, कोकम सरबत, आवळा यांचे सेवन करण्यावर भर द्यावा.
- दिवसभर भरपूर पाणी प्यावे. चहा, कॉफीचे अतिसेवन टाळावे.
- धूम्रपान, मद्यपान टाळावे.
- आले, लिंबू यांच्यापासून तयार केलेल्या पाचकाच्या सेवनाने पित्त कमी होण्यास मदत होते.