पिंपरी-चिंचवड: गांजा बाळगल्याप्रकरणी पाच जणांना बेड्या; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 06:06 PM2021-12-20T18:06:26+5:302021-12-20T18:16:18+5:30
गांजा बाळगून तो ओढत असताना पाच जणांना अटक
पिंपरी: बेकायदेशीरपणे गांजा बाळगून तो ओढत असताना पाच जणांना अटक करण्यात आली. पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सांगवी आणि पिंपरी परिसरात ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत सुनील शिवाजी शितोळे (वय ३४, रा. जुनी सांगवी), असिफ बहादुरशहा सय्यद (वय ४४, रा. काटेपुरम चौक, सांगवी), महेश मलेश रावलल्लू (वय ४२, रा. जुनी सांगवी) यांना अटक करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस फौजदार जिलाणी मोमीन यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दशक्रिया विधी घाट येथे पवना नदीच्या किनारी आडोशाला तिघेजण बेकायदेशीर गांजा बाळगून आहेत. तसेच ते गांजा ओढत आहेत, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. १८) कारवाई केली. आरोपी सुनील शितोळे, असिफ सय्यद, महेश रावलल्लू यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून एक हजार रुपये किमतीचा ४० ग्रॅम गांजा आणि ३५ रुपयांचे गांजा ओढण्याचे साहित्य जप्त केले.
दुसऱ्या कारवाईत यश सर्जेराव खवळे (वय १९, रा. भाटनगर झोपडपट्टी, पिंपरी), मिनाज अजीज आलम (वय २६, रा. काळेवाडी स्मशानभूमीजवळ) यांना पोलिसांनी अटक केली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार राजेंद्र देवराम बांबळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाटनगर येथे दोघेजण गांजा ओढत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी (दि. १९) कारवाई केली. आरोपी यश खवळे, मिनाज आलम या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० ग्रॅम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य, असा एकूण २०० रुपयांचा ऐवज जप्त केला.