जगताप आत्महत्येप्रकरणी मानकर, कर्नाटकी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 07:37 PM2018-06-05T19:37:24+5:302018-06-05T19:40:10+5:30
रेल्वेखाली उडी मारुन जगताप यांनी आत्महत्या केली़ होती. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली़. त्यात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि फोटोमध्ये असलेल्या सर्व जणांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्याचा उल्लेख आढळला होता.
पुणे : जमिनीच्या वादातून जितेंद्र जगताप यांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे़. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर (रा़ नारायण पेठ) आणि बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी, कुख्यात गुंड नाना कुदळे (रा़ केळेवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. ते दोघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़. मंगळवारी (दि. ५जून ) मानकर, कर्नाटकी यांच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर व्हावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुूसार, याप्रकरणी जगताप यांचा मुलगा जयेश जगताप (वय २८, रा़ घोरपडे पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यावरुन मानकर , कर्नाटकी यांच्या त्यांच्या साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानी नगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय२८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६, रा़ शांतीनगर, येरवडा) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़ शांतीनगर येरवडा)यांना अटक केलेली आहेत़ मात्र, नगरसेवक मानकर, कर्नाटक यांच्यासह कुदळे हे फरार आहे. त्यांच्यावतीने हा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तो न्यायालयाने नाकारला.
जगताप यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली़ त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली़. त्यात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि फोटोमध्ये असलेल्या सर्व जणांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्याचा उल्लेख आढळला होता.
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, मुख्य आरोपी दीपक मानकर व अटक केलेले आरोपी यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वेगवेगळे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़. तसेच मानकर हे राजकीय व्यक्ती असून त्यांची दहशत आहे, अशी गोपनीय माहिती आहे़. त्यामुळे हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळ्ण्याची मागणी करण्यात आली होती. ती न्यायालयाने ग्राह्य धरत हा अर्ज नामंजूर केला.