माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 02:46 PM2019-07-19T14:46:31+5:302019-07-19T14:46:58+5:30
मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते.. याप्रकरणी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजगुरूनगर: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज फेटाळला. मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दिलीप मोहिते यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी हा जामीन अर्ज फेटाळला आहे . राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांच्या कोर्टासमोर मोहिते यांच्या बाजूने त्यांचे वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद काल केला होता. सरकारी पक्षाकडून अॅड. अरूण ढमाले यांनी युक्तिवाद केला. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यावर आज निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला आहे
चाकण येथे मोहिते यांचे भाषण झाले होते. त्यानंतर ते पुण्याला बँकेच्या बैठकीसाठी निघून गेले. त्यांच्या भाषणात त्यांनी लोकांना भडकविले तर नाहीच, उलट शांततेचे आवाहन केले होते पोलिसांनीच दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मोहितेंबाबत काहीही उल्लेख नाही. त्यानंतर ८३ आरोपी अटक केले त्यांच्या जबाबामध्ये मोहितेंचा उल्लेख नाही. अचानक एक वर्षांनंतर मोहिते आरोपी असल्याचा पोलिसांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्यावर कटकारस्थान केल्याचे कलम वाढवून मोहितेंना आरोपी करण्यात आले आहे, असा युक्तिवाद दिलीप मोहिते पाटील यांच्या बाजूने त्यांच्या वकिलांनी केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहितेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.