महाराष्ट्र अंनिसतर्फे अधिवेशन काळात नागपूरमध्ये ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 06:17 PM2017-12-09T18:17:16+5:302017-12-09T18:26:41+5:30
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कायम असल्याने महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास अराजक परिस्थिती निर्माण होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि उपाध्यक्ष अशोक धिवरे यांनी दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला २० डिसेंबर रोजी ५२ महिने पूर्ण होत आहेत. पानसरे यांच्या खुनाला ३४ महिने पूर्ण होत आहेत. या खुनांच्या कटामध्ये सनातन आणि हिंदू जनजागरण समितीचा हात असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे अटकेत असले तरी फरार मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच अटकेतील दोघांना जामीनावर सोडण्यासाठी न्यायालयावर दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे कायदा-व्यवस्थेचा धाक कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी जवाब दो धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दाभोलकर आणि पानसरे यांचे खून विचारधारेच्या आधारावर झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा छडा लावण्यासाठी तपास यंत्रणेमध्ये विचारी, विवेकी लोक असण्याची गरज आहे, असे मत धिवरे यांनी व्यक्त केले.
व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी आंदोलन
महाराष्ट्र शासनाने २०११ मध्ये ठरवलेल्या धोरणानुसार तरतुदींच्या अंमलबजावणीय आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचामार्फत केलेल्या मागण्या आणि आश्वासनांच्या कार्यवाहीबाबत उदासिनता दिसून येत आहे. या उदासिनतेचा निषेध करण्यासाठी नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय समितीचे निमंत्रक अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. बडोले यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही मागण्यांबाबत ठोस पावले उचलण्यात न आल्याने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पूर्वसंध्येला (१७ डिसेंबर) नागपूर येथील विनोबा विचार केंद्र येथे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. त्यामध्ये २०२० पर्यंत कृती कार्यक्रम आणि ध्येयधोरणांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.