अनुपम खेर यांचा 'राजीनामा' नाही तर 'यशस्वी' माघार !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 05:27 PM2018-10-31T17:27:58+5:302018-10-31T17:29:32+5:30
अवघ्या वर्षभराच्या कारकिर्दीत केवळ दोन वेळा एफटीआयआय'ला भेट देणाऱ्या खेर यांची कारकीर्द कामापेक्षा गैरहजेरीमुळे लक्षात राहणारी आहे.
पुणे :फिल्म अँड टेलिव्हिजन इस्टिट्यूटचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी कामाच्या व्यस्ततेमुळे राजीनामा दिला आहे. अवघ्या वर्षभराच्या कारकिर्दीत केवळ दोन वेळा एफटीआयआय'ला भेट देणाऱ्या खेर यांची कारकीर्द कामापेक्षा गैरहजेरीमुळे लक्षात राहणारी आहे.
गजेंद्र चौहान यांची एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर तिथे झालेला विरोध संपूर्ण देशाने अनुभवला होता. या काळात घडलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे आंदोलनाला मिळालेले वळण आणि त्यातून संस्थेची झालेली बेअब्रू अजूनही भरून निघालेली नाही. सरकारने हट्टाने चौहान यांची कारकीर्द पूर्ण झाल्यावर खेर यांची त्यांच्याजागी नेमणूक केली होती. त्यांच्या नेमणुकीमुळे अभिनय आणि अनुभव संपन्न व्यक्तीची निवड झाल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र दुर्दैवाने कामाच्या व्यस्ततेमुळे खेर यांनी संस्थेला फारशी हजेरीचं लावली नाही. अगदी सुरुवातीला ऑक्टोबर २०१७मध्ये सूत्र हातात घेतल्यावर त्यांचे थेट नऊ महिन्यांनी अर्थात जुलै २०१८मध्ये दर्शन झाले. त्यानंतर आला तो त्यांचा राजीनामाचं !
मुळात आधी चौहान यांना काम करू न दिल्याने आणि खेर यांना काम करण्यास वेळ न मिळाल्याने संस्थेत अनेक गैरसोयी असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा सूर आहे. स्वतः खेर यांनी जुलैत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या मात्र त्यावर काहीही ऍक्शन घेण्यात आली नसल्याची तक्रार वारंवार करण्यात आली आहे. त्यात सध्या सोशल मीडियात सूरु असलेल्या 'मी टू' आंदोलनात एफटीआयआयच्या विद्यार्थिनींनी उडी घेतली आहे. हे सर्व प्रकरण वाढण्याच्या आधीच खेर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे वादात अडकून टीका होण्याआधीचं खेर यांची माघार 'यशस्वी' मानायला हरकत नाही.