अनुपमा पाटे यांना ‘मेडल आॅफ मेरिट’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:23 AM2018-12-18T01:23:29+5:302018-12-18T01:23:46+5:30
नारायणगाव : येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका अनुपमा पाटे यांना स्काऊट व गाईड विभागामध्ये ...
नारायणगाव : येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका अनुपमा पाटे यांना स्काऊट व गाईड विभागामध्ये सातत्याने वीस वर्षे दीर्घ सेवा करून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विशेष कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड यांच्या वतीने नुकताच ‘मेडल ऑफ मेरिट’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी दिली.
पुणे येथे आयोजिलेल्या या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्य मुख्य गाईड आयुक्त शकुंतला झगडे, पुणे जिल्हाध्यक्ष दिगंबर देशमुख, जिल्हा आयुक्त सुधाकर तांबे, जिल्हा संघटक हिरवाळे, तसेच राज्यातील स्काऊट व गाईडचे मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी अनुपमा पाटे यांचे विशेष अभिनंदन केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडन आणि जपान येथे झालेल्या जांबोरी शिबिरात त्यांनी भारताचे, तसेच राष्ट्रीय पातळीवर दिल्ली, हरिद्वार, कोलकत्ता येथे झालेल्या जांबोरी शिबिरात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.