कोणताही पुरस्कार हे गुणवत्तेचे प्रतीक : विद्याधर अनास्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:14 AM2021-08-29T04:14:46+5:302021-08-29T04:14:46+5:30
पुणे : कोणताही पुरस्कार हे गुणवत्तेचे प्रतीक असते. काहींना पुरस्कार मिळण्याची हौस असते; पण पुरस्काराची यात्रा असावी, त्याचे भक्त ...
पुणे : कोणताही पुरस्कार हे गुणवत्तेचे प्रतीक असते. काहींना पुरस्कार मिळण्याची हौस असते; पण पुरस्काराची यात्रा असावी, त्याचे भक्त होऊ नये, असा सल्ला राज्यमंत्री दर्जा प्राप्त महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह (एमएससी) चे अध्यक्ष ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी दिला.
बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि उद्योगपती विजय पुसाळकर यांना ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार तर, स्वरानंद संस्थेचे प्रमुख प्रा. प्रकाश भोंडे यांना ‘बीएमसीसी गुरुवर्य पुरस्कार’ आणि ब्रिगेडियर सुनील लिमये यांना शहीद कुणाल गोसावी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
याशिवाय ज्येष्ठ अभिनेते श्रीराम पेंडसे, गिरीश परदेशी, श्रद्धा सिदीड, माजी रणजीपटू श्रीकांत जाधव, रिचा चोरडिया आणि शिवानी सातव, उद्योजक नितीन देशपांडे तर विशेष पुरस्काराने, राष्ट्रपती पदक विजेते ए. सी. पी. क्राईम पुणेचे सुरेंद्र देशमुख, तर समाजसेवक कालिदास मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा पुरोहित, बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, संघटनेचे सहसचिव किशोर लोहोकरे, दिनकर अष्टेकर, सुरेश केकाणे, बाळासाहेब गांजवे, सचिन नाईक, सुहास धारणे, संजय साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या हजारो कोटींच्या व्यवहाराची जबाबदारी माझ्या हातामध्ये आहे, पण मला एक रुपयाचा देखील मोह वाटत नाही, या विचारांचा पाया बीएमसीसीमध्ये रचला गेला. राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर मला बंगला, अंगरक्षक असे अनेक प्रोटोकॉल लागू होत होते. मात्र मी त्याला नम्रपणे नकार दिला. अशा पद्धतीने आम्हाला नैतिकत्ता आणि नीतिमत्तेचे धडे गुरुजनांकडून मिळाले. आयुष्य कशा पद्धतीने जगायचे याचे संस्कार गुरुजनांकडूनच मिळतात, अशी भावना देखील अनास्कर यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयाच्या शिकवणुकीमुळे आजही माझे पाय जमिनीवर आहेत. मैफलीनंतर टाळ्यांचा कडकडाट होत असताना मी शांतपणे डोळे मिटून बसलेलो असतो. अशावेळी माझे आजोबा वसंतराव देशपांडे यांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि गायन क्षेत्रात मी आजही विद्यार्थी आहे, याची जाणीव ते करून देतात, अशी भावना व्यक्त करीत राहुल देशपांडे यांनी ‘दिल की तपीश है आफताब’ हे गीत सादर करून वातावरण स्वरमयी केले.
या वेळी उद्योगपती विजय पुसाळकर, प्रकाश भोंडे यांच्यासह इतर पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पटवर्धन यांनी आभार मानले.
--------------