स्त्री-पुरुष कोणीही करू शकते प्लाझ्मादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:07+5:302021-05-01T04:11:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचे निदान होऊन २८ दिवस झालेली १८ ते ५५ वयोगटातील कोणतीही व्यक्ती प्लाझ्मादान करू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचे निदान होऊन २८ दिवस झालेली १८ ते ५५ वयोगटातील कोणतीही व्यक्ती प्लाझ्मादान करू शकते. त्यासाठी वजन, हिमोग्लोबिन, अँटीबॉडीचे प्रमाण, सहव्याधी अशा विविध निकषांचा विचार केला जातो. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाला प्लाझ्मादान करता येते. केवळ गर्भवती महिला किंवा नुकतीच प्रसुती झालेल्या स्त्रिया प्लाझ्मा देऊ शकत नाहीत.
प्लाझ्मा दानापूर्वी कोव्हीड आयजीजी, सिरोलॉजी, रक्ताच्या इतर चाचण्या केल्या जातात. यासाठी साधारण २-३ तास लागतात. सर्व चाचण्या जुळून आल्यास प्लाझ्मा दान करण्यासाठी परवानगी दिली जाते. ज्यांची अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, ते लोक कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्मा दान करू शकतात. टेस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक साधनाची रेंज वेगळी असते आणि त्यानुसार निष्कर्ष काढले जातात. ठराविक पातळीच्या वर अँटिबॉडीची संख्या विकसित झाली असेल तर प्लाझ्मादान करता येऊ शकते.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ''नुकतीच प्रसुती झालेल्या महिला किंवा गर्भवती महिला प्लाझ्मादान करू शकत नाहीत. ज्यांना कोरोनाबाधित होऊन २८ दिवस झाले आहेत, अँटीबॉडी तयार झाल्या आहेत, ज्यांचे वजन ४० किलोपेक्षा जास्त आहे, हिमोग्लोबिन किमान १२ आहे, रक्तदाब नॉर्मल आहे, मधुमेह, ह्रदयविकार किंवा रक्तदाबाची जास्त औषधे सुरू नाहीत, रक्तातून संक्रमित होणारे आजार नाहीत अशी कोणतीही स्त्री किंवा पुरुष प्लाझ्मादान करू शकते. रक्तपेढीत गेल्यावर रक्ताशी संबंधित काही चाचण्या केल्या जातात आणि त्यानंतर प्लाझ्मा घेतला जातो. एक व्यक्तीचा एका वेळी घेतलेला प्लाझ्मा तीन रुग्णांना उपयोगी पडू शकतो. मासिक पाळी सुरू असण्याचा आणि प्लाझ्मादानाचा काहीही संबंध नाही.''
----
प्लाझ्मा थेरपीचा रुग्णांमध्ये खूप उपयोग होतो, असे चित्र नाही. प्लाझ्मादान हे रक्तदानाप्रमाणेच आहे. त्यामध्ये स्त्री किंवा पुरुष, विवाहित किंवा अविवाहित असा फरक करता येत नाही. वय, हिमोग्लोबीन, अँटिबॉडी याचे निकष सर्वांसाठी सारखेच आहेत.
- डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ