दिवाळीच्या सुट्या संपूनही डीईएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे गेट अद्याप बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:05 PM2017-11-03T12:05:27+5:302017-11-03T12:55:43+5:30
शालेय प्रशासनाने रंगकाम काढल्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या संपूनही सक्तीच्या सुटीवर घरी बसावे लागत आहे.
पुणे : दिवाळीच्या सुट्या संपून पुण्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या; मात्र एका शाळेचे गेट विद्यार्थ्यासाठी अद्याप बंदच आहे. शालेय प्रशासनाने रंगकाम काढल्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या संपूनही सक्तीच्या सुटीवर घरी बसावे लागत आहे. खरेतर हे काम उन्हाळी सुट्यांमध्ये करायला हवे होते. मात्र, ऐन शाळेच्या दिवसांमध्ये करण्यात येत असलेल्या या कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता पालकवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
जूनमध्ये शाळा सुरू होताना पालकांना शालेय प्रशासनाकडून सुट्यांचा एक प्लॅनर दिला जातो. त्यामध्ये वर्षभरात मुलांना किती सुट्या दिल्या जातील हे नमूद करण्यात येते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना जे प्लॅनर देण्यात आले होते. त्यामध्ये दिवाळीनंतर ३० आॅक्टोबरला शाळा सुरू होईल, असा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षेच्या शेवटच्या दिवशी अचानक पालकांना शाळेतील रंगकामामुळे शाळा १३ नोव्हेंबरला सुरू होईल, असे सांगण्यात आले; मात्र शाळेत रंगकाम काढण्यासंबंधी पॅरेंट टीचर असोसिएशन (पीटीए) ला देखील पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती, असे पालकांचे म्हणणे आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर, गॅदरिंगचे वारे सुरू होईल. मग जानेवारी, फेब्रुवारीमध्ये युनिट टेस्ट आणि मार्चमध्ये वार्षिक परीक्षा घेतली जाईल. दुसर्या सत्राचा अभ्यासक्रम शाळा कसा पूर्ण करणार आहे हे पालकांना सांगण्यात आलेले नाही. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.
- पालक
शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती, कडीकोयंडे तुटले होते. शाळेच्या वर्गातील भिंती काळ्या झाल्या होत्या. त्यामुळे नवीन दरवाजे बसविणे आणि रंगकाम करणे या गोष्टी प्रकर्षाने करणे गरजेचे होते. दोन महिन्यांपासून ही कामे सुरू आहेत. पालकांना आम्ही शाळा उशिरा सुरू होईल, असे सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी पुढील काळात काही शनिवारी विद्यार्थ्यांचा जादा वर्ग घेण्याचे नियोजन शाळा प्रशासनाने केले आहे.
- श्रीमती नायडू, मुख्याध्यापिका, डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल
पालक-टीचर असोसिएशनला विश्वासात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेण्यात आले असून, शाळा सुरू झाल्यानंतरही, जादा वर्ग घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.
- किरण शाळिग्राम, सदस्य, नियामक मंडळ डीईएस