खेड तालुक्यातील ‘सफरचंदवाली आजी’

By admin | Published: July 8, 2016 04:02 AM2016-07-08T04:02:16+5:302016-07-08T04:02:16+5:30

सफरचंदाची बाग म्हटलं की बर्फाळ प्रदेश डोळ्यांसमोर येतो. देशाचा सर्वांत उत्तर भाग म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागाची आठवण येते. पण खेड तालुक्यातील होलेवाडी

'Apchandwali grandmother' in Khed taluka | खेड तालुक्यातील ‘सफरचंदवाली आजी’

खेड तालुक्यातील ‘सफरचंदवाली आजी’

Next

- संजय बोरकर,  आसखेड

सफरचंदाची बाग म्हटलं की बर्फाळ प्रदेश डोळ्यांसमोर येतो. देशाचा सर्वांत उत्तर भाग म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागाची आठवण येते. पण खेड तालुक्यातील होलेवाडी या छोट्याशा गावातील ६० वर्षीय आजीने घराभोवतालच्या परसबागेत चक्क सफरचंदाची बाग फुलवली. सफरचंदाची फळे हा गावातील कुतूहलाचा विषय ठरला आहे. फुलाबाई पानमंद या आजीची ओळख ‘सफरचंदवाली आजी’ अशीच झाली आहे.
पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील उद्योग, औद्योगिक वसाहत, विमानतळ यासह व्यापार, क्रांतिकारी व शेती व्यवसायाने नावाजलेला तालुका म्हणजे खेड तालुका होय. संत ज्ञानेश्वर, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर व क्रांतिवीर राजगुरुनगरची भूमी म्हणजे खेड तालुका, अशी आगळीवेगळी ओळख राज्यात नव्हे तर देशात आहे. राजगुरुनगरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील होलेवाडी गाव आहे. या गावातील दत्तनगरमधे राहणाऱ्या फुलाबाई पानमंद या आजीच्या घराच्या आवारातील परसबागेत असलेल्या सफरचंदाच्या झाडांना अंजिराएवढी सफरचंदे आलेली पाहायला मिळतात. दोन वर्षांपासून त्यांच्या बागेत सात झाडे आहेत.
पानमंद कुटुंबीयांना प्रतीक्षा आहे, ती फक्त फळांची पूर्ण वाढ होऊन पिकण्याची व त्याची गोडी चाखण्याची. कारण सफरचंदाच्या गोडीवरच ठरणार पानमंद आजीच्या सफरचंदाच्या प्रयोगाचे यश, असे मत कृषितज्ज्ञांचे आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात गुरफटलेला आहे. तर काही ठिकाणी तरुण शेतकरी नैराश्यातून आत्महत्या करत असतानाच पानमंद आजीने सफरचंदाची परसबाग फुलवून एक आदर्श ठेवून शेतकऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घातलेली दिसते, हे नाकारता येणार नाही.
खेड तालुक्यातील माती व हवामान सफरचंदाच्या पिकाला पोषक आहे की नाही, याविषयी कृषी संशोधकांनी संशोधन करून अभ्यास केला पाहिजे, असे मत पश्चिम पट्ट्यातील प्रयोगशील बागायतदार महादू लिंभोरे यांनी व्यक्त केले.

अशी बहरली सफरचंदाची बाग...
दोन वर्षांपूर्वी आजींनी नातवंडांसाठी बाजारातून सफरचंद आणले होते. फळे खाल्यानंतर बिया घरासमोरील तुळशीच्या कुंडीत टाकल्या. बिया रुजल्यानंतर अंकुर फुटलेले कोंब घरासमोरील मोकळ्या जागेत लावले. सफरचंदाचे झाड यापूर्वी पाहिले नव्हते म्हणून कुतूहलाने रोपाची काळजी घेऊन रोप वाढविले आणि सात रोपांची बाग केली. सुमारे बारा रोपे तयार झाली होती; परंतु नातेवाइकांना वाटलेली रोपे त्यांनी गांभीर्याने न घेतल्याने वाया गेली. १० ते १५ फुटांपर्यंत उंचीची झाडे वाढली व १५-२० सफरचंदेही या वर्षी आली.

या ठिकाणी आढळली सफरचंदाची झाडे..
पुणे विद्यापीठाच्या बागेत थेरगाव येथे टेरेस गार्डनमध्ये, मावळ तालुक्यात या ठिकाणी एक-एक झाड होते. परंतु होलेवाडी येथे फुलाबाई पानमंद यांच्या परसबागेत तब्बल सात झाडांना फळे आल्याने हा विषय कुतूहलाचा ठरला आहे.

सफरचंदास आपले येथील हवामान पोषक नाही त्यामुळे त्याचे उत्पादन व दर्जा सिमल्यासारखा असणार नाही. तितकी गोडीही सरपरचंदास असणार नाही. फक्त छंद म्हणून हे करण्यात हरकत नाही. व्यवसाय म्हणून करता येणार नाही.
-लक्ष्मण होटकर, तालुका कृषी अधिकारी

Web Title: 'Apchandwali grandmother' in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.