पथदिवे दुरुस्ती तक्रारींसाठीच्या ॲपला प्रतिसादच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:08+5:302021-03-25T04:13:08+5:30
पुणे : पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या तक्रारींसाठी तयार करण्यात आलेल्या पालिकेच्या ''स्ट्रीट लाईट ॲप'' ला प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. वर्षभरात ...
पुणे : पथदिव्यांच्या दुरुस्तीच्या तक्रारींसाठी तयार करण्यात आलेल्या पालिकेच्या ''स्ट्रीट लाईट ॲप'' ला प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. वर्षभरात अवघ्या २०-२५ तक्रारी प्राप्त झाल्या असून विद्युत विभाग जनजागृती करण्यात तसेच या सुविधेची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यात कमी पडत आहे.
शहरांमध्ये तब्बल साडेतीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते आहेत. यासोबतच सोसायट्यांच्या अंतर्गत असलेले रस्ते, स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या अंतर्गत असलेले रस्ते तसेच टेकड्या आदी ठिकाणी महापालिकेच्या वतीने पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. शहरात लाखोंच्या संख्येने असलेल्या पथदिव्यांना काही ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यात आलेले आहेत. अनेकदा हे पथदिवे बंद पडलेले असतात. कधी त्याची केबल तुटलेली असते, तर कधी बल्ब गेलेले असतात. कधी त्याचे कनेक्शन लूज झालेले असते.
अशा अनेक कारणांमुळे रस्त्याच्या कडेला असलेले दिवे बंद पडतात. परिणामी रस्त्यावर अंधार असतो. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा यामुळे निर्माण होतो. पालिकेकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही अनेकदा हे दिवे दुरुस्त केले जात नाहीत. नागरिकांना त्याकरिता खेटे मारावे लागतात. नागरिकांना पालिकेत किंवा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर या कामासाठी सतत चकरा माराव्या लागू नयेत तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण वेळेत व्हावे याकरिता पालिकेच्यावतीने ''पीएमसी स्ट्रीट लाईट ॲप'' सुरू करण्यात आले होते. परंतु, अशा प्रकारचे कोणते ॲप आहे याची माहितीच नागरिकांना नाही. ही माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यात प्रशासन कमी पडते आहे.
गेल्या वर्षभरात अवघ्या वीस ते पंचवीस तक्रारी पालिकेला या ॲपद्वारे प्राप्त झालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर आपले सरकार या पोर्टलद्वारे ही अवघ्या वीस-बावीस तक्रारी वर्षाकाठी प्राप्त होत असल्याचे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या ॲपसाठी लाखो रुपयांचा खर्च झालेला आहे. शहरातील नागरिकांसाठी सुरु केलेली ही सुविधा नागरिकांपर्यंत पोचलेली नसल्याचे पाहायला मिळते आहे.
-------------
विद्युत विभागाकडे आलेल्या तक्रारी
२०१८-१९ - २१
२०१९-२० - २८
२०२०-२१ - २५