स्कूलबसवर आता नजर ठेवणार ‘अॅप’
By admin | Published: September 6, 2015 03:34 AM2015-09-06T03:34:37+5:302015-09-06T03:34:37+5:30
आपल्या मुलांची स्कूलबस नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, हे शोधणे आता पालकांना सहज शक्य होणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने विकसित केलेल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून
पुणे : आपल्या मुलांची स्कूलबस नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, हे शोधणे आता पालकांना सहज शक्य होणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने विकसित केलेल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून पालकांना ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. स्कूलबसवरील चालक व वाहकावरही लक्ष ठेवता येणार आहे.
केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्यांतर्गत स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, त्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करणे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे या बाबींवर लक्ष केंद्रित करून पुणे आरटीओने मोबाईल अॅप विकसित केले आहे. स्कूल बससाठी पहिल्यांदाच असे अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे स्कूलबसवर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच पालकांना स्कूल बस सुरक्षितता समितीशी संपर्क ठेवणे, बसचा नोंदणी क्रमांक, चालकाचा मोबाईल क्रमांक, बस सुरक्षितता समिती सदस्यांचे मोबाईल क्रमांक, बस वाहतूक मार्ग अशी विविध माहिती या अॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आरटीओ जितेंद्र पाटील यांनी सांगितले.
अॅपद्वारे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनाही स्कूलबस वाहतूक समितीच्या कामकाजाची माहिती ठेवता येणार आहे. वाहनचालकांच्या परवाना वैधतेबाबत आणि बस चालकाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारींबाबत परिवहन विभागासोबतच शाळा व्यवस्थापनास लक्ष ठेवता येईल. तसेच परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुस्थितीत असलेल्या स्कूलबसचा अहवाल व स्कूलबसचे मार्गक्रमण या अॅपद्वारे प्राप्त करता येणार आहे. अॅपमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे, असे पालकांना वाटल्यास त्याबाबत सूचना करण्याची सोयही अॅपमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
२५०० शाळांची अॅपसाठी नोंदणी
अॅपमध्ये शाळांची, शाळेच्या स्कूलबसची, वाहनचालक व वाहकाची, वाहनांची माहिती भरण्याची, ती अद्ययावत करण्याची सोय करण्यात आली आहे. शहरातील जवळपास ४४०० शाळांपैकी सुमारे २५०० शाळांनी अॅपसाठी आवश्यक नोंदणी परिवहन विभागाकडे केली आहे. उर्वरित शाळांची माहिती भरण्याचे काम सध्या सुरू आहे.
मोबाईल अॅपचे नाव : स्कूलबस सेफ्टी पुणे
माहिती अद्ययावत करण्यासाठी संकेतस्थळ : http://schoolbussafetypune.org