'आप्पा, जिजी, आईची काळजी घ्या', मराठा आरक्षणासाठी युवकाने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 01:06 PM2023-11-05T13:06:12+5:302023-11-05T13:06:47+5:30
मी माझा जीव देत आहे. कोणीही कोणाला दोष देऊ नये. मी मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत आहे, असा पत्रात उल्लेख
राजगुरुनगर/आळंदी : मराठा आरक्षणाबाबत सरकारची कार्यपद्धती पाहून चिंबळी (ता. खेड) येथील सिद्धेश सत्यवान बर्गे (वय २१) या युवकाने दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळी संबंधित युवकाचे आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सिद्धेश बर्गे याचे चिंबळी येथे गॅस रिपेअरिंगचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी सिद्धेशने त्याच्या लहान भावाला मी मित्रांसोबत महाबळेश्वरला चाललो असल्याचे सांगितले होते. रात्री त्याचा फोन लागत नाही म्हणून भावाने त्यांच्या मित्रांना फोन केला असता समजले की तो त्यांच्या सोबत गेला नाही. भावाने शोधाशोध केली असता दुकानात सिद्धेशने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. तिथे एक चिठ्ठीही मिळून आली आहे. त्यामध्ये मी माझा जीव कोणाच्या त्रासाला कंटाळून दिला नाही. सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून दिला आहे. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ही माझी इच्छा आहे. त्यामुळे मी माझा जीव देत आहे. कोणीही कोणाला दोष देऊ नये. मी मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत आहे, असा उल्लेख आहे. फक्त माझ्या सोन्या, आप्पा, जिजी, आईची काळजी घ्या, असे लिहून सिद्धेशने खाली सहीदेखील केलेली आहे.