शिधापत्रिकेला आधार जोडणी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:47+5:302021-01-10T04:08:47+5:30
खेड तालुक्यात महसूल विभागाच्या पुरवठा शाखेच्या वतीने आतापर्यंत ८० टक्के कुटुंबांची रेशनकार्डला कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्ड जोडणी केली ...
खेड तालुक्यात महसूल विभागाच्या पुरवठा शाखेच्या वतीने आतापर्यंत ८० टक्के कुटुंबांची रेशनकार्डला कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्ड जोडणी केली आहे. आधारजोडणी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉसद्वारे केवायसी आणि मोबाईलद्वारे ही नोंदणी करता येते. मात्र, कुटुंबातील काही सदस्यांचे आधार कार्ड अद्यापही काढले न गेल्यामुळे काही शिधापत्रिकांची आधारजोडणी राहिलेली आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे अंगठ्याचे ठसे देऊन आधार कार्ड जोडणीसाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली असून घरातील एका सदस्याचा मोबाईल नंबर देणे अनिवार्य आहे. १ फेब्रुवारीनंतर ज्या शिधापत्रिकाधारक अथवा कुटुंबातील ज्या सदस्यांची आधार कार्ड जोडणी केली नसेल, अशा लाभधारकांना युनिटप्रमाणे निर्धारित धान्याचा लाभ मिळणार नाही.
खेड तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर आपल्या धान्य दुकानदारांशी संपर्क करून आपले आधार कार्ड ई-पॉस यत्रांवर अंगठ्याचा ठसा देऊन शिधापत्रिकेला जोडणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.