खूनप्रकरणाला अर्जाने कलाटणी

By admin | Published: November 20, 2015 03:24 AM2015-11-20T03:24:56+5:302015-11-20T03:24:56+5:30

कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनाच्या घटनेनंतर शहरातील गुन्हेगारी आणि राजकारण ढवळून निघाले. टेकावडे खूनप्रकरणातील आरोपी ताब्यात घेतले. तब्बल दोन महिन्यांनी

Appeal against murder | खूनप्रकरणाला अर्जाने कलाटणी

खूनप्रकरणाला अर्जाने कलाटणी

Next

पिंपरी : कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनाच्या घटनेनंतर शहरातील गुन्हेगारी आणि राजकारण ढवळून निघाले. टेकावडे खूनप्रकरणातील आरोपी ताब्यात घेतले. तब्बल दोन महिन्यांनी एका माजी नगरसेवकाने जिवाला धोका असल्याचा अर्ज पोलिसांकडे दिला. टेकावडे खुनाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पिंपरीतील एका व्यावसायिकाच्या घर आणि कार्यालयावर केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या घडलेल्या वेगवान घडामोडींचा एकमेकांशी संबंध येत आहे. एका माजी नगरसेवकाने स्वत:च्या जिवाला धोका असल्याचा अर्ज दिला त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे.
२०११ मध्ये बिजलीनगर येथे झालेल्या गोळीबारात गुंड चव्हाण वाचला होता. या फसलेल्या गोळीबारातील आरोपी तुरुंगात जाऊन आले. अखेर २०१४ ला चव्हाणचा गोळ्या घालून खून झाला. त्याच्या खुनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांचा खून झाला. चव्हाण याच्या खुनी हल्ल्यातील आरोपी हे टेकावडे यांच्याशी संबंधित असल्याच्या सुडबुद्धीने चव्हाण याच्या साथीदारांनी टेकावडे खुनाच्या कटात सहभाग नोंदवला, असे भासवून तब्बल दोन महिन्यांनी आणखी आरोपी ताब्यात घेतले. त्यातील काही चव्हाण याचे निकटवर्तीय आहेत, तर काही टेकावडे यांचे निकटवर्ती मानले जातात. अनेक वर्षांपासून टेकावडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेलेच टेकावडे यांच्या खुनाच्या कटात कसे सामील होऊ शकतात, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
टेकावडे यांच्या खुनाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्यांपैकी एका आरोपीला रसद पुरविणाऱ्या पिंपरीतील व्यावसायिकाच्या मागे केंद्रीय गुन्हे शाखेचा चौकशीचा भुंगा लावण्यात आला. टेकावडे खून प्रकरणाला कलाटणी देण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग मानला जात आहे. अत्यंत शिस्तबद्धपणे गुन्हेगारी क्षेत्रात खेळ्या करणारा मुरब्बी राजकारणी हे उपद्व्याप करीत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात आपली पकड कायम ठेवण्याची खेळी उलटण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने आपलाच ‘गेम’होऊ शकतो, याची कुणकुण लागताच त्याने वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी दाखवली. स्वत:ला वाचविण्यासाठी बुद्धिकौशल्य पणाला लावले आहे. टेकावडे खुनाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या आरोपीला पिंपरीतील एका व्यावसायिकाकडून मदत होऊ शकते. ती होऊ नये, यासाठी आरोपीला मदत करेल या भीतीने व्यावसायिकाला अडकविण्याची खेळी खेळली जात आहे. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साधण्याचा त्याचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)

गुन्हेगारीत राजकारण
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले असे म्हटले जाते. परंतु काही राजकारण्यांचा गुन्हेगारीशी घनिष्ठ संबंध येत असल्याने आता गुन्हेगारीत राजकारण खेळले जात आहे. गुन्हेगारांना हाताशी धरून हवी ती कामे करवून घ्यायची, गुन्हेगार डोईजड झाले की, त्यांना अडकवायचे. दुसऱ्यांना हाताशी धरायचे. ज्याच्यापासून धोका आहे, त्यांना तुरुंगात पाठवायचे. असे उपद्व्याप केले जात आहेत. त्यातून पिंपरीतील गुन्हेगारीत मोठे राजकारण खेळले जात असल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

Web Title: Appeal against murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.