बाह्यवळण विरोधात उच्च न्यायालयात याचिका

By admin | Published: April 24, 2016 04:20 AM2016-04-24T04:20:53+5:302016-04-24T04:20:53+5:30

पुणे-नाशिक महामार्गाला राजगुरुनगर येथून काढण्यात येत असलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या विरोधात बाधित गावांतील सात शेतकऱ्यांनी मुंबई उच्च्य न्यायालयात जनहित याचिका दाखल

Appeal in High Court against Exclusion | बाह्यवळण विरोधात उच्च न्यायालयात याचिका

बाह्यवळण विरोधात उच्च न्यायालयात याचिका

Next

राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गाला राजगुरुनगर येथून काढण्यात येत असलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या विरोधात बाधित गावांतील सात शेतकऱ्यांनी मुंबई उच्च्य न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती एक याचिकाकर्ते आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल ऊर्फ बाबा राक्षे यांनी दिली.
या बाह्यवळणास प्रथम विरोध आणि नंतर काही अटींवर समझोता शेतकऱ्यांनी केला होता; पण समझोत्यात ठरल्याप्रमाणे शासन वागत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी हरकतींच्या सुनावन्यांवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळीच त्यांनी न्यायालयात जाण्याचे सूतोवाच केले होते. त्याप्रमाणे ते आता न्यायालयात गेले आहेत.
सर्वश्री अनिल राक्षे, निवृत्ती होले, रवींद्र राक्षे, शिवाजी सांडभोर, दत्ता ढोरे, हरिभाऊ राक्षे, बबन सांडभोर या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२२) राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्याच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली ते पानमळा असा पाच किलोमीटर लांबीचा दोन टप्प्यातील बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. बाह्यवळण रस्त्यासाठी बागायती जमिनींचे संपादन होणार असल्यामुळे या रस्त्याला राक्षेवाडी, होलेवाडी, वरची भांबुरवाडी या गावांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. या गावातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत.
परिणामी बाह्यवळण रस्त्यासाठी जमीन जाण्यामुळे अनेकजण भूमिहीन होत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या या रस्त्याला तीव्र विरोध होता. बाह्यवळण रस्त्याऐवजी राजगुरुनगर शहरातून उड्डाणपूल उभारावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु, उड्डाणपुलाऐवजी बाह्यवळण रस्त्यासाठी शासन आग्रही आहे.
बाह्यवळण रस्ता मोजणी सुरू केल्यावर बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले होते. मात्र, हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा व समझोता
करून चांगला दर देण्याचे
आश्वासन भूसंपादन महसूल अधिकाऱ्यांनी दिले होते.
(वार्ताहर)

चुकीच्या धोरणांमुळे उड्डाणपूल होईना
‘अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे राजगुरुनगर शहरात उड्डाणपूल होत नाही. पुणे-नाशिक महामार्ग असलेला सध्याचा रस्ता रुंदीकरणासाठी योग्य असून, केवळ ७५० मीटर उड्डाणपुलाची गरज आहे. शिवाय, शहरातील सर्व जागा शासकीय आहेत. त्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. ती काढण्यास शासनाला कोणतीही अडचण येणार नाही. राजगुरुनगर शहरातील रस्ता यापूर्वीच रुंद करण्यात आला आहे अतिक्रमणे काढली आहेत. मात्र, राजकीय हितसंबंध असलेल्या नेत्यांच्या जमिनी पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याच्या कडेला याव्यात या उद्देशाने प्रस्तावित बाह्यवळण इंग्रजीतील ह (डब्ल्यू) या आकाराचे बनविले आहे. या बाह्यवळण रस्त्याला सर्व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.‘देशात अनेक ठिकाणी उड्डाणपूल असताना राजगुरुनगर येथेच उड्डाण पूल का नको? शासनाचा ५० टक्के खर्च वाचणार असताना बाह्यवळण कशासाठी हवे?’ असे सवालही राक्षे यांनी उपस्थित केले आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर बाह्यवळण रस्ता करण्यासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रेडीरेकनर किंवा खरेदी-विक्रीच्या तुलनेत जो दर अधिक असेल त्याच्या तिप्पट मोबदला; तसेच झाडे, घरे, विहिरी यांचा मोबदला देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही.

संपादन होणाऱ्या जमिनींच्याबाबत शेतकऱ्यांनी आधी केलेल्या हरकतींवर २८ जानेवारी रोजी खेड तहसीलदार कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी बाह्यवळण रस्त्याला तीव्र विरोध नोंदवला व न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.

Web Title: Appeal in High Court against Exclusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.