शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मिरवणूक लांबणार, नियम व सूचनांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:47 AM2017-09-05T01:47:32+5:302017-09-05T01:47:49+5:30
गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे या वेळची विसर्जन मिरवणूक लांबण्याची चिन्हे आहेत. गेल्या वीस वर्षांत सर्वाधिक लांबलेली मिरवणूक २00५ मधील होती.
पुणे : गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे या वेळची विसर्जन मिरवणूक लांबण्याची चिन्हे आहेत. गेल्या वीस वर्षांत सर्वाधिक लांबलेली मिरवणूक २00५ मधील होती. तब्बल ३४ तास ही मिरवणूक चालली होती. गेल्या वर्षी २८ तास ३0 मिनिटे चाललेली मिरवणूक यावर्षी किती वेळ लावते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान, पोलिसांनी मात्र, मंडळांना नियमांचे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
पुण्याचा गणेशोत्सव कायमच आकर्षक आणि ऐतिहासिक राहिलेला आहे. पुण्यामधूनच या उत्सवाला सुरुवात झाल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. गणेशोत्सवापेक्षाही शहरातील विसर्जन मिरवणुका कायमच चर्चेत राहिलेल्या आहेत. विसर्जन मिरवणुकांमधील देखावे, विद्युत रोषणाई, मिरवणुकांचा राजेशाही थाट ही वैशिष्ट्ये असतात. मात्र, पोलीस आणि मंडळांच्या वादामुळे विसर्जन मिरवणुका चर्चेत असतात. अनेकदा मंडळांनी पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना सहकार्य न करण्याचेही निर्णय यापूर्वी घेतले आहेत. राजकीय पुढाºयांना मध्यस्ती करून हा तिढा अनेकदा सोडवावा लागला आहे.
मात्र, यावर्षी पोलिसांनी मंडळांशी संवादाची भूमिका
ठेवल्याने अद्याप तरी कोणताही वाद उद्भवलेला नाही. कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पोलिसांनीही चोख नियोजन केले आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानाच्या पाचही गणपतींनी दोन ते तीनच पथके मिरवणुकीमध्ये सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या स्तरावर डॉल्बीमुक्त मिरवणुकीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यालाही बºया प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. परंतु, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. मंडळांनी जय्यत तयारी केलेली आहे. त्यामुळे तूर्तास तरी यंदाच्या मिरवणुकीला किती वेळ लागतो याबाबत उत्सुकता आहे.
गेल्या वीस वर्षांत निघालेल्या मिरवणुकांमध्ये सर्वाधिक वेळ २00५ मधील मिरवणुकीला लागला होता. त्या खालोखाल २00१मध्ये मिरवणुकीला ३२ तास लागले होते. २00७मध्ये ३0 तास २0 मिनिटे मिरवणूक चालली होती. तर सर्वात कमी वेळ चाललेली मिरवणूक २00९ मध्ये निघाली होती. ही मिरवणूक २५ तास १५ मिनिटे चालली होती.
वर्ष वेळ
1997 26 तास
1998 30 तास
1999 28 तास
2000 30 तास
2001 32 तास 15 मिनिटे
2002 30 तास 15 मिनिटे
2003 28 तास 05 मिनिटे
2004 25 तास 30 मिनिटे
2005 34 तास
2006 29 तास 25 मिनिटे
2007 30 तास 20 मिनिटे
2008 28 तास 15 मिनिटे
2009 25 तास 15 मिनिटे
2010 27 तास 14 मिनिटे
2011 27 तास 47 मिनिटे
2012 28 तास 50 मिनिटे
2013 27 तास 25 मिनिटे
2014 29 तास 12 मिनिटे
2015 28 तास 55 मिनिटे
2016 28 तास 30 मिनिटे