बारामतीत ५१ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचे अर्ज, पुण्यातून वसंत मोरेंचा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 12:22 PM2024-04-20T12:22:41+5:302024-04-20T12:24:33+5:30
पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला...
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी शनिवारी (दि. २०) होणार असून, त्यात किती अर्ज बाद होतील हे स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवार (दि. २२) असून, या लोकसभा मतदारसंघासाठी किती उमेदवार रिंगणात आहेत, हे कळू शकणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या संख्येवर प्रत्यक्ष मतदानासाठी किती ईव्हीएम लागतील, हेदेखील स्पष्ट होणार आहे. दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी १२ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ५१ उमेदवारांनी ६६ अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी शनिवारी होणार असून, त्यात त्रुटी आढळलेल्या अर्जांना बाद ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. माघारीनंतर या मतदारसंघासाठी किती उमेदवार रिंगणात उरले आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. या लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख उमेदवारांमध्ये महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे हे प्रमुख उमेदवार आहेत.
पुण्यात ५, शिरूरमध्ये ४ तर मावळात १ अर्ज दाखल
दरम्यान, पुणे, मावळ व शिरूर या तिन्ही मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. त्यानुसार पुणे मतदारसंघात गुरुवारी एक तर शुक्रवारी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात शुक्रवारी प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांचा समावेश आहे. मोरे यांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल न करता सुचकामार्फत अर्ज दाखल केला आहे, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी दोन व शुक्रवारी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी १२ व्यक्तींनी २१ अर्ज नेले आहेत. एका उमेदवाराने अर्ज दाखल केला. आतापर्यंत ३९ जणांनी ७० अर्ज खरेदी केले आहेत. दरम्यान, या तिन्ही मतदारसंघांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल असून अर्जांची छाननी २६ एप्रिल रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल आहे.