अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु; २ ऑगस्टपर्यंत असणार मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:32 PM2021-07-26T19:32:57+5:302021-07-26T19:33:39+5:30
राज्य मंडळातर्फे अकरावी सीईटीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून सीईटीसाठी २० जुलैपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव २१ जुलैपासून संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून पुन्हा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या २ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मात्र, सीईटी अर्जासाठी संकेतस्थळ बदलण्यात आले आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे कळवले.
राज्य मंडळातर्फे अकरावी सीईटीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून सीईटीसाठी २० जुलैपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव २१ जुलैपासून संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले. आता राज्य मंडळाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी २६ जुलैपासून https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावरून अर्ज भरण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल अॅक्सेस करण्याची सुविधा दिली आहे.
संगणक प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी ई- मेल आयडी , पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदवणे अनिवार्य आहे.विद्यार्थ्यांना कोणत्या माध्यमातून परीक्षा द्यावयाची आहे, याबाबत विकल्प निवडावा लागेल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या/ कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करावा लागेल.
-------------
ज्या विद्यार्थ्यांनी २० जुलै ते २१जुलै या कालावधीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत.त्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक व अर्ज भरताना नोंदवलेला मोबाईल क्रमांक टाकून नवीन संकेतस्थळावरून पाहता येईल.या प्रक्रियेत परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.मात्र,प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा अर्जाचा तपशील संकेत स्थळावर नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करावा,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------------------------
राज्य मंडळाची २०२१ पूर्वी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई ,आयसीएसई व अन्य मंडळाचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे.या विद्यार्थ्यांना येत्या बुधवारपासून (दि.२८) पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे,अशी मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.