७९ वर्षांच्या आजोबांचा ७० वर्षांच्या आजींकडे पोटगीसाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:03 AM2019-04-09T09:03:59+5:302019-04-09T09:05:02+5:30
आजोबा शेवटी आजीकडून होणा-या शाररीक आणि मानसिक त्रासाला वैतागले. आजींनी त्यांना जेवण द्यायचे बंद केले. त्या बाहेर जाताना स्वयंपाक घराचे दार लावून घ्यायच्या. या सगळ्याची आजोबांना सवय झालेली. आजोबांनी संस्थेच्या संचालकपदावरुन राजीनामा द्यावा यासाठी आजींनी चक्क आजोबांना मारण्यासाठी घरी गुंड पाठवले.
पुणे : आजोबा शेवटी आजीकडून होणा-या शाररीक आणि मानसिक त्रासाला वैतागले. आजींनी त्यांना जेवण द्यायचे बंद केले. त्या बाहेर जाताना स्वयंपाक घराचे दार लावून घ्यायच्या. या सगळ्याची आजोबांना सवय झालेली. आजोबांनी संस्थेच्या संचालकपदावरुन राजीनामा द्यावा यासाठी आजींनी चक्क आजोबांना मारण्यासाठी घरी गुंड पाठवले. आजोबांनी प्रेम आणि विश्वासापोटी सगळी मालमत्ता आजीच्या नावावर केली. आता आजोबांवर कौटूंबिक कलहाचा ताण आला असून आजीकडे तात्पुरत्या पोटगी आणि खर्चाकरिता अर्ज केला आहे.
पुण्यातील कौटूंबिक न्यायालयात 79 वर्षाच्या आजोबांनी हिंदु विवाह कायदा कलम 24 प्रमाणे तात्पुरत्या पोटगी आणि खर्चाकरुता 70 वर्षांच्या आजीकडे अर्ज केला आहे. यापूर्वी या ज्येष्ठ दाम्पत्यांकडून घटस्फोटाचा दावा दाखल करण्यात आला असून आता हा तात्पुरत्या पोटगीचा दावा एन. आर. नाईकवडे यांच्या न्यायालयात सुरु आहे. आजोबांनी आपल्याकडे सध्या कुठल्याही स्वरुपाचा उद्योगधंदा नसून स्वत:चे पालनपोषण करणे शक्य नसल्याचे अर्जात म्हटले आहे. आजोबा हे हदयविकार आणि मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहेत. तसेच त्यांच्या हदयावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आजी या एका शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकारी असून त्यांना या संस्थेकडून दरमहा 15 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. आजीच्या स्वभावामुळे आजोबांना त्यांच्या कुटूंबाकडून उपेक्षा सहन करावी लागत असल्याने त्यांच्या मदतीकरिता कुणीही पुढे येत नाही. यामुळे आजोबांनी आपल्या स्वत:च्या उदरनिर्वाहाकरिता पन्नास हजार रुपयांची अंतरिम पोटगी मिळावी, अर्जाचा खर्च 15 हजार आणि अर्जदाराची जागा वापरत असलेल्या जागेचे भाडे दरमहा पन्नास हजार व 7 लाख रुपये पोटगी असे मिळुन दरमहा 7 लाख 50 हजार रुपये देण्याची मागणी आजोबांनी न्यायालयाकडे केली आहे.
अर्जदार आजोबा यांना राहत असलेल्या घराशिवाय दुसरे घर नाही. मात्र ते घर आजींनी स्वत:च्या नावावर करुन घेतले आहे. आजोबांनी मोठ्या विश्वासाने ती सगळी प्रॉपर्टी आजींच्या नावावर केली. आजींनी आपली फसवणूक केली आहे. घरामध्ये आपण एकटेच असून माझ्या जेवणाची कुठलीच व्यवस्था केली नसल्याचे आजोबांनी केलेल्या अर्जात म्हटले आहे. आजीपासून जिवीतास धोका असून त्यांचा त्रास वाढत चालला आहे. त्यामुळे शाररीक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची तक्रार आजोबांनी केली आहे. या ज्येष्ठ दाम्पत्याचे 1964 मध्ये लग्न झाले होते. त्यांना आता दोन मुली आहेत. याअगोदर आजोबांनी आजीकडून घटस्फोट मिळावा याकरिता दावा दाखल केला आहे.
- अॅड. वैशाली चांदणे (कौटूंबिक न्यायालय, पुणे)
उतारवयामध्ये पती पत्नीला एकमेकांचा आधार असतो. अशावेळी त्यांनी परस्परांमध्ये संवादाची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. यातून वादाला सुरुवात होते. ज्येष्ठांना एकमेकांच्या सहवासाची गरज असताना अनेकदा त्यांच्यात वेगवेगळ्या कारणांनी बेबनाव तयार होतो. विशेषत: उच्चशिक्षित कुटूंबामध्ये हे प्रमाण जास्त आहे. प्रॉपर्टी वरुन होणा-या वादाची प्रकरणे अधिक आहेत. याकरिता दोघांचे समुपदेशन होणे महत्वाचे आहे. महिला या पुरुषांकडे पोटगी मागताना आपण पाहतो. मात्र पुरुषांना उत्पन्नाचे कुठलेही साधन नसताना ते देखील हिंदु विवाह कायदा कलम 24 प्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात पोटगी मागू शकतात.