गोवंश हत्या प्रकरणातील वाहन परत मागण्याचा अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:02+5:302021-01-08T04:34:02+5:30
दीड लाखाचा दंड ठोठावला, बैलांच्या चारा पाण्यासाठी रोज ३०० रुपये देण्याचा आदेश लोकमत न्यूज नेटवर्क जुन्नर : ...
दीड लाखाचा दंड ठोठावला, बैलांच्या चारा पाण्यासाठी रोज ३०० रुपये देण्याचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : गोवंश हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना संबधीत गुन्ह्यात वापरलेले वाहन परत मिळण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळूत लावत १ लाख ५१ हजार २०० रुपयांचा दंड भोसरी येथील गोशाळेत भरण्याचे आदेश तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ७ बैलांच्या चारा पाण्याच्या खर्चासाठी प्रतिदिन ३०० रुपये देण्याचा आदेश जुन्नर न्यायालयाने दिला आहे.
गोवंश हत्यासंबधीत गुन्ह्यात वापरलेले वाहने परत मिळत असल्याने असे गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढली होती. त्यामुळे न्यायालयाचे या आदेशाने गुन्हेगारांना जरब बसणार असल्याची माहीती अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष शिवराज संगनाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. आरोपी मुतालिफ कुरेशी याने महेंद्र पीक अपमधून कत्तलीच्या हेतूने ७ बैलांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात अल्ताफ कुरेशी हा सुद्धा आरोपी आहे. या प्रकरणामध्ये आरोपी मुतालिफ कुरेशी याने जप्त केलेले वाहन मॅक्स पिकअप परत मिळवण्यासाठी जुन्नर न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जाच्या समर्थनार्थ त्याने गुजरात उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेतला होता. मात्र, आरोपी नेहमी कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक करत असतो, असा युक्तिवाद पोलिसांनी करत या प्रकारचा गुन्हा त्याच्या हातून घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पण घडला होता असे सांगितले. गुन्ह्यांमध्ये आरोपी व अवैध वाहतूक करणारे वाहन या तीनही गोष्टी समान होत्या. नारायणगाव पोलिसांनी त्यावेळी आढळलेले ७ बैल पुण्यातील पांजरपोळ ट्रस्टच्या भोसरी येथील गोशाळेत पाठवले होते. या सर्व बाबी तपासून न्यायालयाने आराेपीचा वाहन परत मिळण्याचा अर्ज फेटाळून लावला. तसेच आनंद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांचा अर्ज मान्य करण्यात आला होता.
यावेळी गोरक्षकांच्या वतीने अॅड. वैभव परदेश, अॅड. प्रशांत यादव,अॅड. गुप्ता, अॅड. मंगेश नढे, अॅड. स्मित शिंदे यांनी न्यायालयात काम पाहिले.