सरकारी योजनांच्या लाभासाठी ९ लाख शेतकऱ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:23+5:302020-12-30T04:16:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज’ या राज्य सरकारच्या कल्पनेला राज्यातील ९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज’ या राज्य सरकारच्या कल्पनेला राज्यातील ९ लाख शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात यात आणखी भर पडणार आहे.
ट्रॅक्टर खरेदीच्या अनुदानापासून बियाणे, शेती अवजारे, ठिंबक किंवा तुषार सिंचनापर्यंतच्या अनेक सरकारी योजनांचा यात समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी यापूर्वी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करावे लागत होते. त्यात वेळ जात असे, अर्जाचा निकाल लवकर होत नसे व अर्जदारापर्यंत लाभही नीट पोहचत नसे. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने ‘महाडीबीटी’ हे संकेतस्थळ विकसीत केले आहे. त्यावर ९ लाख शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत नोंदणी केली आहे.
या अर्जांची छाननी सध्या कृषी विभाग करत आहे. ज्या योजनेत उपलब्धतेपेक्षा जास्त अर्जदार आहेत, त्यात सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे अशा योजनांची यादी तालुका स्तरावर तयार करण्याच्या सुचना देण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावरील योजनांसाठीही याच पद्धतीने काम होणार आहे. अर्जाची छाननी, पात्र अर्जदारांची यादी, त्याची योजनानिहाय नोंद अशा बऱ्याच गोष्टी यात कराव्या लागणार असल्याने आयुक्त कार्यालयात सध्या याचीच गडबड सुरू आहे.
शेतकऱ्यांनी संकेतस्थळावरून अर्ज करायचा. त्यात आधार कार्ड, मोबाईल क्रमांक बँक खात्याबरोबर लिंक करून सोबत आवश्यक ती सर्व माहिती द्यायची आहे. त्यानंतर कृषी विभाग अर्जाची छाननी करून पात्र अर्जदारांना योजनेत समावेश झाल्याचे कळवणार आहे. त्यानंतर त्याने स्वखर्चाने खरेदी करायची, त्याच्या पावत्या संकेतस्थळावर ‘स्कॅन’ करायच्या व त्यानंतर मंजूर अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे.