तीन दिवसांत २५ फूट पत्रे लावा, अन्यथा काम थांबवा; महामेट्रोला पुणे महापालिका आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:32 PM2023-11-17T12:32:08+5:302023-11-17T12:33:13+5:30
वाढत्या धूलिकणांमुळे देशभरातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाने अतिधोकादायक पातळी गाठली असून पुणे, पिंपरी-चिंचवडही धोकादायक पातळीवर
पुणे: वाढत्या धूलिकणांमुळे देशभरातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाने अतिधोकादायक पातळी गाठली आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यावरण विभागाने विविध मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुणे महामेट्रोतर्फे स्वारगेट येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत तिथे २५ फूट पत्रे व हिरवी जाळी लावावी, अन्यथा काम थांबवावे, असा इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.
वाढत्या धूलिकणांमुळे देशभरातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाने अतिधोकादायक पातळी गाठली आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण लक्षात घेऊन शहरांमध्ये सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल तसेच मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धूलिकण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना राज्याच्या पर्यावरण विभागाने दिल्या आहेत.
नेमकी समस्या काय आहे?
शहरात महामेट्रोतर्फे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. यात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेसाठी स्वारगेट येथे मेट्रो हब उभारण्यात येत आहे. हे हब अत्यंत वर्दळीच्या अशा जेधे चौकालगत असून त्यासमोरच एसटी स्थानक व पीएमपी डेपोही आहे. या मेट्रो हबमध्ये भूमिगत मेट्रो स्टेशनसह वर बहुमजली व्यावसायिक इमारत उभारली जाणार आहे. हे काम वेगाने सुरू असून बांधकामासाठी आवश्यक काँक्रीट जागीच उपलब्ध व्हावे, यासाठी येथे रेडी मिक्स काँक्रीट प्लांट (आरएमसी) उभारण्यात आला आहे. हा प्लांट सातत्याने सुरू असतो. बांधकामासाठी आवश्यक साहित्य आणणाऱ्या वाहनांचीही येथे सातत्याने ये-जा सुरू असते. मात्र, येथील कामाच्या भोवती पत्रे लावण्यात आले असले तरी आरएमसी प्लांटलगत पत्रे लावलेले नाहीत. तसेच हिरवी जाळीही लावलेली नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसांत आवश्यक उपाययोजना न केल्यास येथील काम थांबविण्याचा इशारा दिला आहे.