आॅनलाईन अर्ज तुम्हीच अप्रुव्ह करा !
By admin | Published: June 14, 2015 12:24 AM2015-06-14T00:24:32+5:302015-06-14T03:54:09+5:30
अकरावी प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे अर्ज अप्रुव्ह करण्यासाठी लॉगीन आयडी व पासवर्ड दिला आहे.
पुणे : अकरावी प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे अर्ज अप्रुव्ह करण्यासाठी लॉगीन आयडी व पासवर्ड दिला आहे. या प्रक्रियेत आॅनलाईन अर्ज अप्रुव्ह करण्याचा अधिकार केवळ मुख्याध्यापकांनाच देण्यात आला आहे. मात्र, काही मुख्याध्यापकांनी चक्क विद्यार्थ्यांना पासवर्ड देऊन टाकल्याचे समोर आले आहे. ‘तुम्हीच अर्ज भरून अप्रुव्ह करा,’ असे या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी व पालकांना सांगितले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यात काही गडबड केल्यास संपूर्ण प्रक्रियेवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अकरावी प्रवेशासाठी मागील वर्षीपासून आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेश अर्ज भरून दिले जात आहेत. जे विद्यार्थी विविध आरक्षणासाठी पात्र ठरतात, त्यांना त्यांचे आॅनलाईन अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अप्रुव्ह करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना स्वतंत्र लॉगीन आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे. त्याचा वापर करून संबंधित मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या संबंधित आरक्षणाच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची तपासणी करून अर्ज अप्रुव्ह करतात. त्यानंतर हा अर्ज प्रवेशाच्या मुख्य प्रक्रियेत येतो.
या अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास मुख्याध्यापक आयडीचा वापर करून त्यात बदल करू शकतात. मात्र, काही शाळांतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनाच हा आयडी व पासवर्ड देऊन टाकला आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरून तो अप्रुव्ह करण्याचे अधिकारच संबंधित मुख्याध्यापकांनी देऊन टाकले असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहिती किती खरी आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आॅनलाईन भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकारही मुख्याध्यापकांनाच आहे. तसेच त्यांच्या लॉगीनमध्ये सर्व अर्जांची माहिती असते. त्यामध्ये फेरबदल करता येतात. हा पासवर्ड वापरून एका विद्यार्थ्याने जरी खोटी माहिती भरली तरी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये गुणवत्ता यादी जाहीर करताना गोंधळ होणार आहे. त्यामुळे काही मुख्याध्यापकांनी केलेली ही चूक प्रवेश समितीच्या डोक्याला ताप ठरण्याची शक्यता आहे.
मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी व पासवर्ड देणार नाहीत. तरीही असे झाले असल्यास प्रत्यक्ष प्रवेशावेळी कागदपत्रांची तपासणी करूनच गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश नियमानुसारच होईल. गुणवत्ता यादीवरही फारसा परिणाम होणार नाही. तसे झाल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत बेटरमेंटची संधी दिली जाईल.
- रामचंद्र जाधव,
शिक्षण उपसंचालक व अध्यक्ष केंद्रीय प्रवेश समिती