ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयांसाठी दोन एमडी डॉक्टर नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:40+5:302021-04-30T04:14:40+5:30
पुणे : ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयांसाठी आतापर्यंत जिल्हा परिषदेमार्फत ५१ एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, गुरुवारी पहिल्यांदाच ...
पुणे : ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयांसाठी आतापर्यंत जिल्हा परिषदेमार्फत ५१ एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, गुरुवारी पहिल्यांदाच दोन एमडी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना हिंजवडी येथील कोविड रुग्णालयात नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर ६ एमबीबीएस आणि २ बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती आज करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद कोविड रुग्णालयासाठी एमडी आणि एमबीबीएस डॉक्टरांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या जाहिरातीला सुरुवातीच्या काळात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यासह अन्य जिल्हा आणि राज्यातील एमबीबीएस डॉक्टरांची भरती करणार येणार आहे. त्यांना तब्बल ९० हजार रुपये वेतन दिले जाणार असल्याने, या नंतर मोठ्या प्रमाणात इच्छुकांचे अर्ज आले.
आतापर्यंत ५१ एमबीबीएस डॉक्टरांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. त्यांना कोविड रुग्णालयावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी नव्याने २ एमडी डॉक्टर, ६ एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोर, मुळशी, शिरुर आणि हिंजवडी येथील कोविड रुग्णालयात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २ बीएएमएस डॉक्टरांना हिंजवडी कोविड रुग्णालयात रुजू होण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाने दिले आहे. या नव्या भरतीमुळे जिल्ह्यात चांगली आरोग्य सेवा देणे शक्य होणार आहे.